पुणे शहर

आपला कुठलाच देव बॅचलर नाही! महापुरूषही बॅचलर नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : आपला कुठलाच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही असं वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आपला कुठलाही देव बॅचलर नाही आपले कुठलेही महापुरूष बॅचलर नाहीत. संसार करून सगळं करता येतं. सेवाही करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं आहे. देवाने माणसाला घडवताना कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखंच बनवून पाठवलं. सगळ्यांना दोन कान, दोन डोळे आणि समान शरीर देवाने दिलं आहे. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही तो स्पर्म १०० किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कुणीतरी आहे ना? सगळी माणसं त्याने बनवली आहेत. इंग्रज आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायला लागलो. आपली संस्कृती विसरलो.

आपल्या देशावर कितीतरी आक्रमणं झाली, मुस्लिम, इंग्रज, डच आले काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचेही हाल करण्यात आले. मात्र छत्रपती संभाजी महाराजांनीही आपला धर्म सोडला नाही. त्यांच्यावर किती अत्याचार झाले तरीही त्यांनी धर्म सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला आणि जगवलाही. मुघलांनी मुलींचा चेहरा कुणी पाहू नये म्हणून घुंगट आणले. पण आता तिला बाहेर काढा. तिला शिकू द्या. आपल्या जगात तीन संस्कृती आहेत. एक सांगते बापाला मारा, दुसरी सांगते तू तुझा विचार कर दुसऱ्याचा विचार सोडून दे, तिसरी आपली हिंदू संस्कृती आहे जी सांगते तू आधी दुसऱ्याला मोठं कर हिंदू शब्दावर आक्षेप असेल तर भारतीय म्हणा पण ही संस्कृती दुसऱ्याला मोठं करणारी आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये