गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांना अटक करण्यात आली असतानाच आता सदावर्तेंना दुहेरी झटका बसला आहे. सातारा कोर्टाने गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई पोलिसांकडून सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेतला होता. काल रात्री उशीरा पोलिसांनी त्यांना सातारा येथे आणलं. त्यांना सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्यात आलं. कडेकोट बंदोबस्तात सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. धार्मिक तेढ तसेच वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात समन्स बजावूनही उपस्थित राहत नसल्याने सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.










