छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका : मोदी

पुणे : संत भिन्न परिस्थितीत समाजाला गती देण्यासाठी पुढे येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारख्या संतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांना नमन केले. मोदी म्हणाले की, पूर्ण देशात प्रसाद योजनेंतर्गत तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळाचा विकास केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थांचा विकास झाला आहे. आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेले महू असेल किंवा लंडनमधील त्यांच्या घराचे स्मारकात रुपांतर, मुंबईतील चैत्यभूमीचे काम, नागपूरमधील दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित करण्याचे काम असो किंवा दिल्लीमधील महापरिनिर्वाण झालेल्या ठिकाणी मेमोरियलचे निर्माण असेल हे पंचतीर्थ नव्या पिढीला बाबासाहेबांची ओळख करुन देत आहेत. संत तुकाराम म्हणायचे की योग्य दिशेने सर्वांचे प्रयत्न असतील तर अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवता येते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त देशाने आपले संकल्प शंभर टक्के पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकांना शिक्षा झाली. तेव्हा ते तुरुंगात तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. वेगवेगळा कालखंड वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. मात्र या सर्वांसाठी संत तुकाराम यांची वाणी आणि उर्जा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. आता आषाढामध्ये पंढरपूरची यात्रा सुरु होणार आहे. चारधाम यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो या यात्रा आपल्यासाठी एक उर्जास्त्रोत आहेत. याच यात्रांच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेला जिवंत ठेवलेलं आहे. विविधता असताना भारत हजारो वर्षांपासून एका राष्ट्राच्या रुपात उजूनही उभा आहे. आपल्या राष्ट्रीय एकतेला मजबूत करण्यासाठी आपले काही कर्तव्य आहे. आपण आपली प्राचीन ओळख आणि परंपरा यांना चैतन्यपूर्ण ठेवलं पाहिजे.



आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे. सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांनाच मिळतोय. देशात महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केला जातोय. पंढरपूरची वारी ही संधीच्या समानतेचं प्रतिक आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजेच समाजात शेवटी बसलेल्या व्यक्तीला आपले समजून त्यांचे कल्याण करणे हेच संताचे लक्ष्य आहे. हाच देशासाठी संकल्प आहे. हाच संकल्प घेऊन देश पुढे जातोय. दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणे ही प्राथमिकता आहे.
भेदभाव करणे पाप
आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंगाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आल्या आहेत. संत तुकाराम सांगायचे की समाजात उच्च- नीचतेचा भेदभाव करणे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजासाठी महत्त्वाचा आहे.
संत तुकाराम महाराज यांच्यातील दया, करुणा तसेच सेवा त्यांच्या अभंगांच्या रुपात आजही आपल्यासोबत आहे. या अभंगांनी आपल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. ज्याचा भंग होत नाही. जो वेळेनुसार शास्वत आणि प्रासंगिक असतो तोच अभंग असतो. आज देश सांस्कृतिक मूल्यांवर पुढे जात आहे. यावेळी संत तुकाराम यांचे अभंग आपल्याला उर्जा देत आहेत. मार्ग दाखवत आहेत. संत नामदेव, संत एकनाथ, संत सावता महाराज, संत नरहरी महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत चोखामेळा यांच्या अभंगांमधून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते.
भारत ही संतांची भूमी
देश आपल्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आपण जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक आहोत. याचे श्रेय भारत देशातील संत परंपरा तसेच ऋषींना आहे. भारत ही संतांची भूमी असल्यामुळे हा देश शास्वत आहे. प्रत्येक युगामध्ये आपल्याकडे देश तसेच समाजाला दिशा देण्यासाठी कोणीतरी महान व्यक्ती आलेला आहे. आज देश संत कबीरदास यांची जयंती साजरी करतोय. संत ज्ञानेश्वर महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे हे ७२५ वे वर्ष आहे. या महान व्यक्तींनी आपल्या शास्वततेला सुरक्षित केलं. भारताला गतीशील ठेवलं.
आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो.
पालखी मार्गाचे काम
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या पूर्ण कामात ३५० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासठी ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.



