खोदाईमुळे पुण्यातील रस्त्यांची दुरावस्था ; आयुक्त व अधिकाऱ्यांनी दुचाकी वरून पाहणी करावी..

सेवा वाहिन्या खंडित करणाऱ्या व वेळेत काम पूर्ण ना करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी..
पुणे : प्रशासनाने तंबी दिल्यानंतर ही अनेक ठिकाणी शहरात खोदाईची कामे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. या खोदाईच्या कामामुळे रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्त व अधिकाऱ्यांनी या रस्त्यांची दुचाकी वरून पाहणी करावी व सेवा वाहिन्या खंडित करणाऱ्या व वेळेत काम पूर्ण ना करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे. Poor condition of roads in Pune due to excavations; The commissioner should inspect from a bike
खर्डेकर यांनी म्हंटले आहे की, खोदाई मुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे सर्वप्रथम आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी दुचाकी वरून शहरभर फेरी मारावी व खोदाईच्या कामाची व रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी करावी म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना त्यांना कल्पना येईल. शहरातील एकूणच खोदाईच्या कामाचे ऑडिट करावे त्यामुळे एकूण खोदाईला दिलेल्या परवानग्या, प्रत्यक्षात झालेली खोदाई व नियमांचे पालन झाले किंवा कसे हे ही प्रशासनाच्या लक्षात येईल.( रस्ता किती मीटर खणून वाहिन्या टाकायच्या ह्याची नियमावली आहे त्याप्रमाणे खणले आहे किंवा नाही हे तपासावे )

तसेच खोदाई करताना अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या तोडल्या गेल्याने घरीच असणाऱ्या व घरून काम करणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कुठे महावितरण ची तर कुठे बी एस एन एल ची तर कुठे पाण्याच्या लाईन तोडल्याचे निदर्शनास आले. मात्र या प्रकारांमुळे काम करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने ते बिनधास्त असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी अद्याप ही ह्या वाहिन्या दुरुस्त झालेल्या नाहीत. अनेक रस्ते केबल कंपनी, महावितरण, एल अँड टी यांनी खणून अनेक दिवस झाले ( महिने ) मात्र अद्याप रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. त्याची कालमर्यादा काय ? याची माहितीही पालिकेने जाहीर करावी.
एखादा दुचाकीस्वार ह्या रस्त्यांवरून घसरून पडला त्यास इजा झाली, फ्रॅक्चर झाले तर त्याला जबाबदार कोण ? त्यामुळे मान्सून पूर्वी रस्ते पूर्ववत करून पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.



