रोलबॉल क्रीडा प्रकाराला राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – संदीप खर्डेकर

राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न
पुणे : रोलबॉल ह्या खेळाचा जनक पुण्यातील तरुण राजू दाभाडे आहे याचा तर सार्थ अभिमान आहेच पण जिद्दीने आणि कष्टाने या तरुणाने वा त्याच्या टीमने रोलबॉल ह्या खेळाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली असून आज 57 देशात हा खेळ खेळला जातो या यशाने ऊर भरून येते असे गौरवोदगार संदीप खर्डेकर यांनी काढले. ह्या खेळाला पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशातच नव्हे तर जगभर राजाश्रय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
महाराष्ट्र रोल बॉल संघटना आणि पुणे जिल्हा रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 व 2 मे 2022 रोजी, पवार पब्लिक स्कूल, नांदेड सिटी, पुणे इथे करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. लवकरच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाने यांस सहकार्य करावे अशी अपेक्षा राजू दाभाडे यांनी व्यक्त केली. तसेच ह्या खेळाच्या प्रचार वा प्रसारासाठीसाठी शासनासह विविध उद्योजकांनी ही पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव चेतन भांडवलकर यांच्या हस्ते आणि रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया तांत्रिक समिती अध्यक्ष आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, पुणे या जिल्ह्यातील मुले व मुलींच्या संघानी सहभाग घेतला होता.

मुलांच्या गटांमध्ये तृतीय क्रमांक सामना जळगाव विरुद्ध अहमदनगर या दोन संघांमध्ये झाला हा सामना अहमदनगर संघाने ५-० असा एकतर्फी जिंकला अहमदनगर संघाकडून हर्षल घुगे तीन तर वेदांत घुगे, विराज बिंगी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविले.
अंतिम सामना पुणे आणि कोल्हापूर यांच्यामध्ये झाला. हा सामना पुणे संघाने ६–४ असा जिंकला पुणे संघाकडून अथर्व धायगुडे श्रेयश बोंबले यांनी प्रतेकी दोन तर मधुसूदन रत्नपारखी, आदित्य गणेशवाडे यांनी प्रत्येकी एक गोल केला, कोल्हापूर संघाकडून आदित्य सुतार दोन तर रोनक कणसे व आदित्य मगदूम यांनी प्रत्येकी एक गोल केले.
मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचा सामना ठाणे विरुद्ध अहमदनगर यांच्यात झाला हा सामना अहमदनगर संघाने २-१ असा जिंकला अहमदनगर संघाकडून संजना ठुबे हिने दोन गोल करून विजय मिळवून दिला, ठाणे संघाकडून आशा नागाला हिने एक गोल केला. अंतिम सामना पुणे विरुद्ध कोल्हापूर या दोन संघांमध्ये झाला, अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये कोल्हापूरच्या अपूर्वा पाटील हिने एकमेव गोल करून कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र रोल बॉल संघटना उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा रोल बॉल संघटना अध्यक्ष गजानन थरकुडे , नांदेड सिटीचे संचालक नरसिंह लगड, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद काळे यांनी केले आभार प्रदर्शन ॲड. अमोल काजळे पाटील यांनी केले.















