अप्रमाणित प्रोटीन पावडर बाबत जनहित याचिका दाखल करणार ; चुकीच्या प्रोटीनचे सेवन जीवघेणे : फिटनेस तज्ञ ॲड. बाळकृष्ण निढाळकर
पुणे : जिमला जाणारे अनेक जण आपल्या डाएट मध्ये प्रोटीन पावडरचा वापर करत असतात. प्रोटीन पावडर बनवणाऱ्या अनेक कंपन्या आज मार्केट मध्ये आहेत. मात्र प्रोटीन पावडर शरीरासाठी किती सुरक्षित आहे यावर कायमच चर्चा होत आलेली आहे.
आज प्रोटीन पावडर बनवणार्या अनेक कंपन्या दिशाभूल करणारे दावे करून प्रोटीन पावडरची विक्री करत आहेत. हे दावे किती खरे खोटे हे कोणी तपासून पाहत नाही. अनियंत्रित पद्धतीने प्रोटीन पावडर विक्री करून आरोग्याला हानी पोहचण्याचा धंदा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘लॉ लॅब इंनोवेशन’ द्वारे लोकहितासाठी कार्यरत अनेक वकील आणि वकिली शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी प्रोटीन पावडर विक्री आणि आरोग्याचे अधिकार या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन सहयोग ट्रस्टच्या डेक्कन येथील कार्यालयात केले होते.
या वेळी फिटनेस इंडस्ट्री मधील तज्ञ ॲड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी चुकीच्या प्रोटीनच्या अनावश्यक सेवन त्यातून निर्माण होणारे जीवघेणे आजार याबाबत अनुभव कथन करताना सांगितले कि, प्रोटीन पावडर जर प्रमाणित नसेल तर किडनी खराब होण्यापासून ते हृदय विकार होण्यापर्यंत अनेक व्याधींनी ग्रस्त होऊन मृत्यू होऊ शकतो. कृत्रिमरीत्या दिखाऊ शरीरयष्टी तयार करण्याचा नाद चुकीचा आहे असेही निढाळकर म्हणाले.
सार्वजनिक-सामाजिक स्वास्थ्याचा मुद्दा म्हणून प्रोटीन पावडरची अंनियंत्रित विक्री, अन्न व औषध विभागाचे नियम धुडकावून प्रोटीन पावडर विकणार्या कंपन्या व याबाबतच्या कायद्याची अंबलबजावणी न होणे अशा सर्व विषयावर लवकरच जनहित याचिका करण्यात येईल अशी माहिती ॲड.असीम सरोदे आणि ॲड.संदीप लोखंडे यांनी दिली. बेकायदेशीर प्रोटीन पावडरची निर्मिती आणि विक्री याचे खूप मोठे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत असल्याबाबत अनेकदा बोलले गेले व अश्या बेकायदेशीर प्रोटीन पावडरचा करोडो रुपयांचा व्यापार राज्यात सुरु आहे अशी माहिती इंटरनेट रिसर्च मधून पुढे येत असल्याचे ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले.
प्रोटीन पावडर, आरोग्य आणि कायदा या संदर्भात झालेल्या चर्चेत ॲड.रमेश तारू, ॲड.श्रीया आवले, ॲड.किशोर वरक,ॲड. शिल्पा शिंदे, रिशान सरोदे, कुलसुम मुल्लाणी, संध्या सोनवणे, आकांक्षा सुपलेकर, यशराज देशमुख, मुस्कान सतपाल, मोहम्मद उबेद, शुभम नागरे, रिषभ शर्मा, जोम मॅथीव्ज, ओम भुरंगे, सहभागी होते.
प्रोटीन पावडर सेवनामुळे ज्यांना आरोग्य समस्या झाल्या असतील यांनी 9890420143 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन ॲड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी केले.