ताम्हिणी घाटात बस उलटली; दोघांचा मृत्यू, 55 जखमी

पुणे : माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स बस उलटून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 55 जण जखमी झाले आहेत.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखाली उतरल्याने उलटली. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्याहून खासगी कंपनीची सहल कोकणात येत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस उलटली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर काही प्रवासी जखमी असून काही प्रवासी बसमध्येच अडकले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना झाल्या आहेत. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
















