पुणे अर्बन सेलने सायकल रॅली काढत दिला पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश…

पुणे : दीपावली हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण..हा सण साजरा करताना, जीवन प्रकाशमय करताना आपल्या पर्यावरणाला हानी पोहोचू नये, याची काळजी घेणे, आपले कर्तव्य आहे. या कर्तव्याची जाणीव करून देताना जागरूकता निर्माण करण्यासाठी आज पुणे अर्बन सेलच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
बालगंधर्व नाट्यगृह मंदिर ते सेनादत्त पोलीस चौकी, दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य एनवायरमेंटल हॉल अशी ३ किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात आली होती. शहरातील पर्यावरणावर आणि शहरावर निस्वार्थी प्रेम करणाऱ्या अनेक नागरिकांनी या रॅलीत अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत सहभाग घेतला.

रॅलीच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या भुमातेचे अर्थात पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत शपथ घेण्यात आली. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या निसर्गाचा आनंद घेता यावा आणि त्यांचे जन्मसिद्ध हक्क त्यांना मिळावे, यासाठी उपस्थित शपथबद्ध झाले.



यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये ४० शहरे आपल्या देशातील असून ही परिस्थिती बदलणे आपल्याच हातात आहे. आपली समृद्ध संस्कृती आणि इतिहास जपताना, त्याची वृद्धी करताना आपले सामाजिक भान सर्वांनी जपावे, अशी विनंती त्यांनी या प्रसंगी बोलताना केली.



पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्नील दुधाने म्हणाले, सण साजरे करताना आपल्या निसर्ग आणि अन्य नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रदूषणविरहित दिवाळी साजरा करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आम्ही दिला आहे. या सायकल रॅलीचे यश आपल्या कृतीवर अवलंबून असून ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे जनजागृती करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.



पुणे अर्बन सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर..
याप्रसंगी अर्बन सेलमध्ये अनेक नवोदितांना संधी प्राप्त करून देत शहरातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघाच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यामध्ये कोथरूडच्या अध्यक्षपदी सचिन यादव, खडकवासलाच्या अध्यक्षपदी मीनल धनवटे, कसबाच्या अध्यक्ष पदी आप्पासाहेब जाधव, वडगाव शेरीच्या अध्यक्ष पदी नीता गलांडे, पर्वतीच्या अध्यक्ष पदी अमोल परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. याचसह पुणे शहरातील महत्वपूर्ण विभागात नियुक्ती करताना प्रामुख्याने क्रीडा विभागात शहर समन्वयक म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक मदन वाणी सर यांची नियुक्ती करण्यात आली.





