पुणे शहर

पुणेकर रमले 85 वर्षांपूर्वींच्या चवींच्या हिंदोळ्यावर

पुणेः सायकलींचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, संस्कृतीची राजधानी आदी बिरुदे अभिमानाने मिरविणा-या पुणेकराच्या ओळखी मध्ये भर घालणा-या आणि पुण्याच्या खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चेहरा प्राप्त करुन देणा-या चवींचा अर्थात पुण्यातील खाद्य संस्कृतीशी संबंधीत आद्य जनकांचा प्रातिनिधीक स्वरुपात आज पूना गेस्ट हाऊस येथे महापाैर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सारेच पुणेकर भावूक होऊन 85 वर्षांपूर्वी चाखलेल्या चवींच्या आठवणीत रममाण झाले.

पुणे शहराच्या साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक समृद्धीचे आणि परिवर्तनाचे साक्षीदार असलेल्या पूना गेस्ट हाऊसला मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 2020  रोजी  85 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त पुण्यातील खव्वय्यांचे लाड पुरवणारे चितळे बंधु, आद्य अमृततुल्य, बेडेकर मिसळ, बादशाही बोर्डिंग आणि हिंदुस्थान बेकरी या 5 खाद्य उद्योजकांचा सत्कार सोहळा आज महापाैरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, संवाद पुणेचे सुनील महाजन,अभय सरपोतदार, सनत सरपोतदार, शर्मीला सरपोतदार, साधना सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

महापाैर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याचे विविध संदर्भानी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव घेतले जाते.पुण्याने स्वातंत्र्य लढ्यापासून विविध चळवळीचे नेतृत्व केले आहे. खाद्य जगतातील आज प्रातेनिधीक स्वरुपात करण्यात आलेल्या सत्कारार्थी मुळे चवीच्या बाबतीत देखील ही पुणेकर नेतृत्व करीत आहेत. पुण्याच्या या खाद्य संस्कृतीचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.

हेमंत रासने यावेळी म्हणाले, आज केल्या जाणा-या खाद्य उद्योजकांचा सत्कार हा केवळ उद्योजकांचा नसून तो खाद्य महर्षींचा सत्कार आहे. 14 विद्या आणि 64 कला करीता ओळख असलेल्या पुण्याची या उद्योजकांनी जिभेचे लाड पुरवणारे पुणे अशी देखील करुन दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले. यावेळी अनेक संस्मणीय आठवणींना त्यांनी उजाळा दिला. सुनील महाजन यांनी देखील यावेळी पूना गेस्ट हाऊसला रंगणा-या राजकीय गप्पांच्या फडांचे स्मरण करीत आठवणींना उजाळा दिला.

सत्कारार्थींच्या वतीने चितळे बंधुंचे प्रमुख श्रीकृष्ण चितळे यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. बादशाही बोर्डींगच्या वतीने सदानंद छत्रे, बेडेकर मिसळच्या वतीने अनिल बेडेकर, आद्य अमृततुल्यच्या वतीने रोहित नर्तेकर आणि हिंदुस्थान बेकरीच्या वतीने अजित कुमठेकर यांनी सत्कार स्विकारले. यावेळी पूना गेस्ट हाऊसच्या प्रतिनिधी शिरिष कुलकर्णी, सतीश बालदे, संजय घोलकर यांचा देखील प्रातेनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

शर्मीला सरपोतदार, साधना सरपोतदार यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचलन आणि मानपत्रांचे वाचन
केले, तर सनत सरपोतदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये