पुणे शहर, जिल्हा

पुण्यात ‘छात्रों की गुंज’ मध्ये राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी संवाद ; महिला सुरक्षेवर धक्कादायक आकडेवारी केली सादर

‘छात्रों की गुंज’ ठरला तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम

पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. विशेष म्हणजे उपस्थितांमध्ये जेन झी पिढीतील तरुणींची संख्या लक्षणीय होती. या वेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अनुभव आणि भविष्यातील अपेक्षा जाणून घेतल्या.

कार्यक्रमाचे स्वरूप पारंपरिक राजकीय सभेपेक्षा संवादात्मक ठेवण्यात आले होते. अनेक विद्यार्थिनींनी मंचावर येत आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. काहींनी घरातून होणारी अडवणूक, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष, तर काहींनी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या छेडछाडीचे अनुभव सांगितले.

Img 20260222 wa00064513382578852640289



यावेळी राहुल गांधी यांनी मुली आणि महिलांना पुढे जाण्यासाठी समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच देशातील महिलांची सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा करत त्यांनी महिला हिंसाचाराशी संबंधित विविध आकडेवारी विद्यार्थिनींसमोर मांडली.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान पीपीटीच्या माध्यमातून भारतातील महिला हिंसाचाराचे चित्र विद्यार्थिनींसमोर मांडले. देशात महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडतात; मात्र त्यातील मोठ्या प्रमाणावर प्रकरणांची नोंदच होत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

देशात मुलगी जन्माला येण्यापूर्वीच दरवर्षी सुमारे साडेचार लाख मुलींची अर्भकहत्या केली जाते, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुमारे ८० टक्के मुलींना कधी ना कधी विनयभंगाचा सामना करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय, बस, रस्ता आणि रेस्टॉरंट अशा विविध ठिकाणी मुलींना या प्रकारच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, सुमारे २९ टक्के महिलांना शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो, तर भारतात १०० पैकी सहा महिलांवर बलात्कार होतो, अशी धक्कादायक आकडेवारी राहुल गांधी यांनी मांडली. घरापासून रस्त्यापर्यंत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत त्यांनी महिला आणि तरुणींना सुरक्षित, समान आणि स्वतंत्र वातावरण मिळण्याची गरज अधोरेखित केली.

विद्यार्थिनींच्या प्रश्नांना थेट सामोरे जात राहुल गांधी यांनी त्यांच्या अनुभवांवर संवाद साधला. त्यामुळे ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता तरुणींच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा संवादात्मक कार्यक्रम ठरला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये