पुणे शहर

संत गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजेे लोकशिक्षण देेणारे ग्रामीण विद्यापीठ होते ; लेखक वि.दा.पिंगळे

पुणेः- आपला समाज सुखी आणि विज्ञानवादी व्हावा, यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांनी मोठी समाजक्रांती केली. संत गाडगेबाबांचे कीर्तन म्हणजेे लोकशिक्षण देेणारे ग्रामीण विद्यापीठ होते, असे मत प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वारजे जकात नाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजीत भव्य ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात ‘लोकशिक्षक संत गाडगेबाबा’ या विषयावर वि.दा. पिंगळे यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या शेवटच्या पुष्पाचे अध्यक्ष संतोष देशपांडे, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि देवेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ग्रंथोत्सव आणि व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलतांना वि.दा. पिंगळे म्हणाले की, माणसाला माणुसकीने वागण्याचे व्यसन जडावे, यासाठी संत गाडगे बाबांनी कीर्तन या प्रभावी परंपरेचा स्वीकार केला. त्यांनी आपल्या आयुष्यातील 50 वर्षे समाज प्रबोधन आणि लोक क्रांतीसाठी खर्च केली. हातात झाडू घेऊन त्यांनी जमिनीवरचा कचरा साफ केला, त्याचप्रमाणे माणसांची मने स्वच्छ व्हावी, म्हणून त्यांनी आपल्या विचारांना कीर्तन या माध्यमाची जोड दिली.

समाजात असलेला कर्मकांड, अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ‘आधी केले आणि मग सांगितले’, ही उक्ती गाडगेबाबांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. ‘जेथे राबती हात तेथे हरि’ ही त्यांची विचार धारणा होती. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. श्रम करणा-या हातांमध्ये मला परमेश्वराचे दर्शन घडते, असे म्हणणा-या गाडगेबाबांचा सगळा दिवस श्रम करण्यात जात असत. मंदिरांमध्ये लाखो रूपयांची देणगी देणा-या हातंपेक्षा गावाचा परिसर स्वच्छ करणारे हात मला अधिक पवित्र वाटतात असे गाडगेबाबा म्हणायचे.
गाडगेबाबांनी आपल्या लोकोत्तर कार्याद्वारे फाटक्या वस्त्रांना महावस्त्राचे थोरपण प्राप्त करून दिले.त्यांना मिळालेली नवी वस्त्रे त्यांनी गोरगरीब जनतेला दान केली. त्यांनी आपल्या वस्त्रांना महत्त्व दिले नाही, तर आचार आणि विचारांना महत्त्व दिले. आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजापुढे आदर्श निर्माण केला.

Img 20211129 wa0128

आपल्या शरीराचे किंवा जिभेचे चोचले त्यांनी कधी पूर्ण केले नाहीत. भूईचे आंथरूण आणि आभाळाचे पांघरूण घेणा-या या महान समाज सुधारकाने कधीही कष्ट केल्याशिवाय भाकरीचा तुकडा देखील खाल्ला नाही. स्वतः निरक्षर असूनही त्यांनी साक्षरतेचे महत्त्व ओळखले होते. समाजातील सगळ्या मुलामुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, असे ते नेहमी सांगायचे.गाडगेबाबांनी अनेक धर्मशाळा, शाळा, आश्रम शाळा, सदावर्ते, गोपालन शाळा बांधल्या. पण त्यांनी यापैकी कोणत्याच ठिकाणी कधीही मुक्काम केला नाही. स्वतःचे जीवन समाजाला समर्पित करून ते कायमच समजात जाऊन राहिले. या एक तासाच्या व्याख्यानात वि.दा. पिंगळे यांनी गाडगेबाबांचा संपूर्ण जीवनपट उलगडवून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये