दिलीप वळसे-पाटील यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून असतील हे संभाव्य उमेदवार
मुंबई : अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आणि मंत्री झालेल्यांना आगामी निवडणुकीत पाडण्याचा प्लॅन राष्ट्रवादी तयार करत आहे. त्यानुसार दिलीप वळसे-पाटील ज्या आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करतात तिथून भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवले असल्याचे सुत्रांकडून कळत आहे. तसेच निवडणूक कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. निकम हे काही महिन्यापूर्वी झालेल्या कृषि बाजार समितीवर अपक्ष म्हणून निवडून आले होते. सध्या ते आंबेगाव कृषि बाजार समितीचे सभापती आहेत.
अजित पवार यांनी बंड केल्यावर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे पवार यांच्या बरोबर दिसले होते. पण नंतर त्यांनी आपण शरद पवार यांच्याशी निष्ठा असलेला कार्यकर्ते आहे, असे सांगत शनिवारी येवल्याला शरद पवार यांच्या उपस्थितीत जोरदार भाषण केले होते. कोल्हे यांनी पक्षाकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला होता. पण पक्षाने तो काही स्वीकारला नाही. दरम्यानच्या काळात आंबेगांव विधानसभेसाठी कोल्हे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. पण कोल्हे यांचा लोकसभेतील परफॉर्म चांगला असल्याने, शिवाय प्रफुल पटेल सध्या शरद पवार यांच्या सोबत नसल्याने त्यांना पवार यांनी लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान आंबेगाव हा दिलीप वळसे-पाटील यांचा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठीचे नियोजन राष्ट्रवादीने सुरू केले आहे.
त्यानुसार दुसऱ्या फळीतल्या चांगले काम करणारे पदाधिकारी\ कार्यकर्ते यांची चाचपणी सुरू झाली असून आंबेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीने तिकीट न् दिल्याने अपक्ष लढवणारे तसेच निवडून येत सभापती झालेल्या निकम यांच्यावर येत्या काळात मोठी जबाबदारी पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गाव, तालुका स्तरावर पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पोहचवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. निकम हे त्यासाठी कामाला लागल्याचे समजते. दिलीप वळसे -पाटील यांच्या विरोधात जोरदार टक्कर देण्याची क्षमता निकम यांच्याकडे असल्याने त्यांचे नाव आंबेगाव विधानसभेसाठी सगळ्यात पुढे असल्याचे समजते.