खोट्या विकासाच्या आशा दाखवून पुणेकरांच्या जीवाशी खेळ करू नये ; शरद पवार

पुणेः- खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असतांना नदीचे पात्र कमी करणे हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे द्योतक ठरू शकते. पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला होता. अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेक पुणेकर देशोधडीला लागले. असे असतांना अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते, असा थेट सवाल ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज विचारला. Don’t play with the lives of Punekars by showing false hopes of development; Sharad Pawar
नगरसेवक दिलीप बराटे यांच्या पाठपुराव्यातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या आधुनिक आणी सुसज्ज अशा कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचे लोकार्पण खासदार आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अभ्युदय बराटे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी आमदार कुमार गोसावी, लक्ष्मी दुधाने, सचिन दोडके, किशोर, बाबा धुमाळ, किशोर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ही वास्तू उभारण्यात मोलाचे सहकार्य करणा-या महानरपालिकेच्या पदाधिका-यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.



शरद पवार म्हणाले की, देशात कोरोनासारखे मोठे महासंकट नुकतेच येऊन गेल्यानंतर सर्वसामान्यांचा आर्थिक ताळेबंद कोलमडला आहे. विस्कळीत झाला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, अनेकांचे व्यापार बुडाले, अनेकांना विविध स्तरावर आर्थिक झळ सहन करावी लागते आहे. कोरोनासारख्या महाकाय संकटातून आपण नुकतेच कसेबसे बाहेर पडत असतांना जगावर तिस-या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.



युक्रेनमध्ये मेडीकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्यार्थ्यांबाबत देशाच्या नेतृत्वाने अधिक तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. संकटग्रस्त विद्यार्थी, परराष्ट्र खाते आणि सरकार यांच्या समन्वयाचा अभाव दिसून येत असून याचा थेट फटका विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बसत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ज्या उपाययोजना विद्यार्थ्यांना सुचवल्या जात आहेत, त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाहीये. रशियाकडून सासत्याने होत असलेला गोळीबार, हल्ले आणि प्रचंड थंडीमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. मी काही विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता तिथली परिस्थिती चिंताजनक आहे.
नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसापोटी झालेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून नवाब मलिक प्रतिनिधीत्व करीत असतांना हे प्रकरण आणि ही कारवाई पुढे येण्यामागे केवळ राजकीय आकस आहे. पंतप्रधानांनी विकासकामांची उद्घाटने करावी, परंतू आधी युक्रेनमध्ये अडकलेले निष्पाप विद्यार्थी भारतात सुखरूप येतील, यादृष्टीने कार्यवाही करावी.
दिलीप बराटे म्हणाले, वारजेचा सामाजिक शैक्षणिक, आरोग्य दृष्टीने आम्ही विकास केला. आमच्याकडे येणारी जास्त लोक हे वैद्यकीय मदतीसाठी येत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी वारजे त एक अद्ययावत हॉस्पिटल उभा करण्याचा संकल्प केला आणि तो आज पूर्ण होत आहे,याचा आनंद व समाधान आहे. या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मदत झाली. २५ कोटी रुपयांचा निधी या हॉस्पिटलसाठी मंजूर करून घेतला. सर्व आरोग्य विषयक सुविधा आता या हॉस्पिटल मधून नागरिकांना मिळणार आहेत.
रूपाली चाकणकर आणि प्रशांत जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बराटे यांनी केले. दिपाली धुमाळ यांनी आभार मानले.



