मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कोथरूड मध्ये राजकीय घडामोडी, शिवसेनेचे (उबाठा) नितीन शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश..

कोथरूड : कोथरूड शिवसेनेचे समन्वयक, संघटक नितीन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. नितीन शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आज पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची वाट धरली आहे. आजच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी आर्ज दाखल केला असून कोथरूड मध्ये नवीन राजकीय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे.

शिंदे यांनी 1993 मध्ये भाजपाचे काम सुरू केले. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, युवा मोर्चा कोथरूड अध्यक्ष पुणे शहर उपाध्यक्ष आणि भाजपा कडून स्विकृत सभासद ही पदे त्यांनी भूषवली. मुरलीधर मोहोळ यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु काही कारणास्तव त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत त्यांनी पुणे शहर समन्वयक, कोथरूड चे संघटक म्हणून काम केले आहे.



शिंदे यांचा भाजप प्रवेशामुळे भाजपने बेरजेचे राजकारण सुरू केले असल्याचे दिसत आहे. शिंदे यांचा कोथरूड मधील पौड रस्ता परिसरात जनसंपर्क चांगला आहे त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना फायदा होऊ शकतो. मुरलीधर मोहोळ यांचा जुना सहकारी पुन्हा भाजप मध्ये आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पहिल्यापासून जनसंघाचे आणि भाजप काम करत असल्याने त्याच विचारधारेचे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनाआपल्या भागात जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले.





