महाराष्ट्र

“हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर…”, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : “पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्यांवर भाजप व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. ‘‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’’ असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी मुंबईत हिंदू समाजाने ‘जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं होतं. यावरून शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल, असा टोलाही शिवसेनेने ‘सामना’तून केंद्रातील भाजप सरकारला लगावला आहे.

“महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे?” 

“महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे. हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. या आधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे, असा टोमणा शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

कश्मीर खोऱ्यात आजही हिंदू पंडितांचे पलायन

“कश्मीर खोऱ्यात आजही हिंदू पंडितांचे पलायन सुरू आहे, पंडितांच्या हत्या थांबलेल्या नाहीत व हजारो हिंदू पंडित जम्मूच्या रस्त्यांवर न्यायासाठी आक्रोश करीत आहेत. त्याच पंडितांचा आक्रोश मनात साठवून मुंबईत हिंदूंचा ‘जन आक्रोश’ उसळला असेल तर दिल्लीत बसलेल्या शक्तिमान हिंदू राज्यकर्त्यांना त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये