राष्ट्रीय

नव्या सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात; तातडीच्या सुनावणीला न्यायालयाचा नकार

मुंबई : नव्या सरकारविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी करत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभूंनी याचिका दाखल केली आहे. शिंदे सरकारचा शपथविधी बेकायदेशीर आहे. कुठल्या नियमांखाली सत्तास्थापनेचे निमंत्रण देण्यात आले, अशी विचारणा करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कपिल सिब्बल आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याचिकेत काय आहे?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन पाचारण करण्यात आलं असून त्यामध्ये राज्य सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

“अपात्रतेची नोटीस बजावलेल्यांनाही तुम्ही शपथविधीला बोलावलं. बहुमत असणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं गेलं. पण एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं गेलं? ते कोणत्या पक्षाचे म्हणून बोलावलं गेलं? संविधानाचा मांडलेला खेळ यामधून दिसून येतो”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी शिवसेनेची बाजू मांडली आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना बजावलेल्या अपात्रतेच्या नोटीस प्रकरणाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळली असून नव्या याचिकेसह अपात्रता नोटीस प्रकरणातील याचिकेवर देखील ११ जुलै रोजीच सुनावणी घेणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

“कालपर्यंत बहुमत चाचणीचा विषय नव्हता. आता ताबडतोब चाचणी घेण्याचे निर्देश आले. मग तुमच्या अपात्रतेसंदर्भातल्या प्रलंबित खटल्यांचा निर्णय काय होणार? सर्वोच्च न्यायालयाचा यावर सविस्तर निर्णय यायला हवा”, अशी अपेक्षा अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये