राजकीय

शिवसेनेकडून संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. शिवसेना छत्रपती संभाजीराजेंना उमेदवारी देणार की नाही यावर तर्क-वितर्क लढवले जात असताना अखेर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. तसंच मावळे असल्यानेच राजे असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोलाही लगावला. दुसऱ्या जागेसाठी आपलं नावही ठरलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील”.

“कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं”.

संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते”.

“यापूर्वीसुद्धा वरिष्ठ शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

राज ठाकरेंविरोधात शरद पवारांनीच रसद पुरवल्याच्या मनसेच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही एवढे हिमतीचे लोक आहात ना, जायचं उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश आणि दिल्लीत तुमचंच सरकार आहे. बृजभूषण सिंह सामान्य खासदार आहेत. नाचता येईला अंगण वाकडे अशी मराठीत एक म्हण आहे”.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये