शैक्षणिक फीसाठी पालकांना त्रास देणे थांबवा ; भाजपा युवा मोर्चाचा शैक्षणिक संस्थांना आंदोलनाचा इशारा..

पुणे : करोनाच्या संकटामुळे उद्योग, व्यवसाय, नोकरी, दुकाने, हे सर्व गेल्या एक वर्षापासुन बंद आहेत. बहुतांश लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. लोकांना पूर्ण पगार गेले कित्येक महिने झालेले नाहीत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यामुळे बरीच कुटंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत. त्यातच अनेक शैक्षणिक संस्था पालकांना मुलांच्या फी साठी तगादा लावून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत. न्यायालयाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याबाबत आदेश दिले आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पालकांना त्रास दिला जात आहे त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने शहरातील शैक्षणिक संस्थांना पत्र देण्यात आले असून संस्थेबद्दल तक्रार आल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. Stop harassing parents for education fees otherwise we will agitate ; bjp Yuva morcha
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली कोथरुड मधील विविध शैक्षणिक संस्थांना पत्र देऊन फी संदर्भात पालकांना त्रास देण्यात येऊ नये याबाबत निवेदन देण्यात आले. पालकांनी फी बाबत तक्रारी केल्यास संबधित संस्थां विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला.

यावेळी महेश पवळे, अक्षय भदे, प्रतीक पाटील, अथर्व कुलकर्णी, अपर्णा लोणारे, ऋषी बराटे, निलेश सोनवणे, रोहन कोकाटे, धनंजय रसाळ, अतुल शिंदे, स्वप्नील राजिवडे, लखन कळमकर, लक्ष्मण चव्हाण, शिवम बालवडकर, सायंदेव देहदराय, ओंकार देवकुळे, शुभम मोकाटे, गणेश झोंबाडे, पार्थ मठकरी, देवेंद्र जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे रिजल्ट अडवणे, ऑनलाईन वर्गातून किंवा what’s app ग्रुप मधुन काढुन टाकने, असे प्रकार केले जात असून मुलांच्या भविष्यासाठी पालक या सर्व गोष्टी सहन करत आहेत आणि याचा गैरफायदा शालेय व्यवस्थापन घेत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.
उच्च न्यायालयाने १ मार्च रोजी मे २०२० पूर्वी ज्या शाळांनी शैक्षणिक शुल्क निर्धारित केले आहे ते तसेच राहील हा आदेश दिला आहे. असे असले तरी त्या आदेशाचा गैरफायदा शैक्षणिक संस्था घेत आहेत, परंतु त्या आदेशात फी न भरू शकणार्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक नुकसान अथवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा मुलभूत अधिकारात बाधा येईल असे वर्तन कोणत्याही शैक्षणिक संस्थेकडून होणार नाही याबाबत स्पष्ट आणि कडक निर्देश दिले आहेत.
वास्तविक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सिव्हिल रिट याचिका निकाली काढताना देशातील सर्व शाळांना स्पष्ट आदेश दिले आहेत की पालकांना फी भरण्यासाठी मुबलक हप्त्याची सोय करून द्यावी. वरील गोष्टी आपल्या संस्थेत होत नसतील असे आम्हास वाटते परंतु यदाकदाचित आपल्या संस्थेतून या बाबत काही गैरप्रकार घडला अथवा आपण वर नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही पालकांची अडवणूक केल्याचे निदर्शनास आले तर भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या विरुद्ध तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजयुमो च्या वतीने देण्यात आला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
१. कोणत्याही विद्यार्थ्यांना फक्त फी न भरल्याच्या कारणास्तव शैक्षणिक फायद्यापासून वंचित ठेवले जाऊ नये.
२. फी भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने यांनी निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुलभ हाफ्याने फी भरण्याची मुभा मिळावी
३). उशिरा फी भरणार्या पालकांवर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक दंड आकारू नये.
४). ऑनलाईन क्लासरूम मधुन विद्यार्थ्यांंना काढले जाऊ नये (यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम होत आहे.)
५). ज्या सुविधांचा वापर या वर्षात झालेला नाही त्याबाबत कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जाऊ नये. ( उदा. ग्राउंड शुल्क, कॉम्प्युटर लॅब शुल्क वैगेरे.)
६). शैक्षणिक शुल्क न भरल्याच्या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याची गुणपत्रिका तसेच शाळा सोडल्याचा दाखला आडवणे. असे प्रकार होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी.
७). गेल्या 1 वर्षात यदाकदाचित आपल्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या घरातील कर्ता पुरुष covid मधे वारले असतील अश्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात यावी.



