उष्णतेची लाट : राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, परिपत्रक जारी

पुणे : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान मध्ये मोठी वाढ झाली असून उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दि. 21 एप्रिलपासून राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या आशयाचे परिपत्रक शुक्रवारी काढण्यात आले आहे.
या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना 21 एप्रिल पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा असे आदेशात म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे विदर्भ वगळता 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होतील. तसेच विदर्भ विभागातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील. एकंदरीतच राज्यातील वाढती उष्णतेची लाट लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय तातडीने घेतल्याचे सांगण्यात येते.
