डॉ.शशांक कुलकर्णी यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार पदी निवड

पुणे : सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील कृषी धोरण संशोधक, लेखक व कवी डॉ शशांक कुलकर्णी यांची नुकतीच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सल्लागार पदी निवड झाली आहे. या निवडीची माहिती विद्यापीठाचे प्रादेशिक सेवा विभागाचे संचालक डॉ उमेश चंद्र पांडे यांनी त्यांना पत्राद्वारे दिली.
ही निवड लोकप्रशासन या विषयासाठी झाली आहे. डॉ शशांक कुलकर्णी सद्या जम्मू केंद्रीय विद्यापीठाच्या लोकनिती व लोकप्रशासन विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. याअगोदर त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सीनियर रिसर्च फेलो म्हणून महत्वपूर्ण संशोधन कार्य केले आहे. त्यांनी राष्ट्रीय शेतकरी धोरण व विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर पीएचडी पूर्ण केली असून सामाजिक, तत्वज्ञान व अध्यात्मिक विषयावर त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
त्यांच्या स्वामीनाथन आयोगावरील पुस्तकाची, या विषयावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. त्यांनी केलेल्या संशोधन, सामाजिक व लेखन कार्याबद्दल विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी सन्मान केला आहे. रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील स्वाहिली विद्यापीठाने त्यांना डिलीट प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे. डॉ कुलकर्णी यांच्या या निवडीबद्दल त्याचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.







