यंदा आम्ही…मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना नागरिकांकडून अशा काही प्रतिक्रिया मिळाल्या की ज्यामुळे..

कोथरूड : विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. कोथरूड मतदार संघातील वातावरण शेवटच्या टप्प्यातील प्रचाराने तापले असून उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी व पदयात्रांवर भर दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांना आज प्रचारा दरम्यान नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.
तुमचं काम छान आहे, राज साहेब ठाकरेंची सर्व भाषणे आम्ही ऐकतो, त्यांच्या भाषणांनी आम्ही प्रभावित झालो आहोत, यंदा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत अशा भावना नागरिकांनी प्रचारादरम्यान मनसेचे कोथरुड मतदार संघाचे उमेदवार किशोर शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या. या मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे लढण्यासाठी आणखी बळ व ऊर्जा मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ॲड. किशोर शिंदे यांनी आज प्रचारादरम्यान वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला. कोथरूडच्या नवसह्याद्री सोसायटी कर्वेनगर, मेहंदळे गॅरेज आणि एरंडवणे परिसरातील उद्यानांना त्यांनी भेट दिली. डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, शहीद मेजर ताथवडे उद्यान, स्व.राजा मंत्री उद्यान या उद्यानांमध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. आमदार म्हणून निवडून आल्यावर मी आपल्या सर्व अपेक्षांची पूर्तती करेल असे आश्वासन किशोर शिंदे यांनी यावेळी सर्व नागरिकांना दिले.
यावेळी किशोर शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभाग क्र १३ मधील विभाग अध्यक्षा सुरेखा होले, दत्ता पायगुडे, गणेश शेडगे, योगेश वाव्हळ, राजेश शिगवण, हर्षद खाडे, अनिता शिंदे, उषा आवळे, गीता वायचाल आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.









