शासकीय कंत्राटी नोकर भरतीविरोधात पुण्यात विविध संघटनांची निदर्शने

पुणे : शासकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतल्यानंतर त्याविरोधात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष दिसून येत आहे. तरुणाईने या निर्णयाविरोधात सविनय कायदेभंगाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केले आहे.
भारत जोडो अभियान, पुणे जिल्ह्याच्या वतीने शासकीय कंत्राटी नोकरभरती निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित निदर्शने कार्यक्रमात ते बोलत होते. भारत जोडो अभियानाशी संबंधित सर्व संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शासकीय कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या धोरणाला हरताळ फासणारा आहे. समान काम समान दाम या तत्वाला पायदळी तुडवणारा आहे. त्याच बरोबर शासकीय कार्यालयाचं कामकाज आणखी विस्कळीत करणारा व नागरिकांना अडचणीत आणणारा ठरेल असे मत विविध वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कंत्राटी नोकरभरतीचा शासन निर्णय रद्द करावा असे निवेदन याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले. निदर्शकांनी याप्रसंगी शासन निर्णयाची प्रत फाडून आपला निषेध व्यक्त केला.













