पुणे शहरातील सर्व दुकाने उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहणार !

पुणे : राज्यातील करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचा दिसत असला तरी देखील, अद्यापही रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज भर पडतच आहे. शिवाय, काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कमी रुग्णसंख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषद घेत, शहरातील नव्या निर्बंधांबाबत माहिती दिली.(All shops in Pune city will be open from 7 am to 2 pm from tomorrow!)
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. याशिवाय, शहरातील उद्यानं, व्यामशाळा(जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सुरू राहणार आहे.

पुढील दहा दिवसांसाठी हा आदेश असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
- पुण्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकानं सुरू राहणार.
- शनिवारी आणि रविवारी सकाळी सात ते दोन या कालावधीत फक्त आत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहणार. बाकी दुकाने बंद राहणार
- पी एम टी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार
- हॉटेल्स बंद राहणार मात्र पार्सल सुविधा सुरू
- उद्याने बंद राहणार
- सरकारी कार्यालयं पन्नास टक्के कर्मचारी संख्येने सुरु राहतील.
- मद्याची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
- दुपारी तीननंतर मात्र संचारबंदी राहील.
- अत्यावश्यक सुविधा वगळून इतरांना तीननंतर बाहेर पडण्यास मनाई असेल.









