कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील बेकायदेशीर कामांना नोटिसा ? पत्र्याची शेड्स काढून घेण्यास सुरवात..

कर्वेनगर : कर्वेनगर मधील महालक्ष्मी गार्डन ते दुधाने लॉन्स या टप्प्यात डी पी रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकाम व पत्र्याच्या शेड्सला महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून ही नोटीस मिळाल्यानंतर येथील पत्र्याची शेड्स काढून घेण्यास सुरवात झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेत प्रशासक राजवट लागू झाल्यापासून शहरात सर्वत्र बेकायदेशीर कामांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या पुर्वी पालिका प्रशासनाने म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यान मोठ्या प्रमाणावर कारवाई करत येथील बेकायदेशीर कामे जमीनदोस्त केली होती.
आता महालक्ष्मी गार्डन ते दुधाने लॉन्स या टप्प्यात डी पी रस्त्याच्या कडेने बेकायदेशीर बांधकाम व पत्र्याच्या शेड्सला नोटिसा देऊन 24 तासाची मुदत दिल्याची माहिती मिळत आहे. या नोटीशिंमुळे येथील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या टप्प्यात रस्त्याच्या कडेने चार चाकी वाहनांची गॅरेजेस, टर्फ ग्राउंड, हॉटेल, कॅफे, जिमन्याशियम, मंगल कार्यालये आहेत. या व्यवसायांसाठी अनेकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. कारवाई होण्याच्या धास्तीने अनेकांनी शेड्स काढून घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. याचा अनेक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार असून त्यांची चिंता वाढली आहे.












