मिशन निर्मल स्वच्छता अभियान: नागरिकांचा वाढता सहभाग, अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण , सुतारवाडी परिसरात स्वच्छतेचा संकल्प

अभियानाच्या 22 व्या दिवशी म्हाळुंगे गावात स्वच्छतेचा जागर
पुणे : अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन निर्मल स्वच्छता अभियानाने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण , सुतारवाडी परिसरात स्वच्छतेची नवी लाट निर्माण केली आहे. या अभियानाच्या २१व्या आणि २२व्या दिवशी स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा संकल्प बळकट केला आहे.
अमोल बालवडकर म्हणाले, या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांनी इतर सर्वांना स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ हा मंत्र प्रत्येकाने अंगीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो.‘मिशन निर्मल’ स्वच्छता अभियानाने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण , सुतारवाडी परिसरात स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला असून, येत्या काळातही हा उपक्रम अधिक गतीने आणि सहभागाने पुढे जाईल, यात शंका नाही.

म्हाळुंगे गावात स्वच्छतेचा जागर
२१व्या दिवशी अभियानाने म्हाळुंगे गावठाण, मारुती मंदिरापासून राधा चौकापर्यंत, तसेच पिंपळाची तालीम आणि लेन क्रमांक १, २, ३ या परिसरांना स्वच्छतेची कामे करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी एकत्र येत रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. घनकचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत परिसराला स्वच्छ आणि सुंदर रूप देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. या उपक्रमादरम्यान नागरिकांनी ‘स्वच्छ परिसर, सुंदर परिसर’ या भावनेला उजागर करत कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आत्मसात केले.



म्हाळुंगे ते सुनील नगरपर्यंत स्वच्छतेचा उत्साह
२२व्या दिवशी अभियानाने म्हाळुंगे गाव, शितळा देवी नगर, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे-बालेवाडी मागील बाजू), कीर्ती लीजेंड अपार्टमेंट, ऑर्किड हॉटेल ते सुनील नगर आणि एड्युकॉन इंटरनॅशनल स्कूल या परिसरात स्वच्छतेचा वसा पुढे नेला. स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी एकत्र येत रस्ते, नाले आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा हटवला. या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वच्छतेच्या या चळवळीला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली.



नागरिकांचा वाढता सहभाग: अभियानाची ताकद‘मिशन निर्मल’
अभियानाला दररोज मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ही या उपक्रमाची खरी ताकद आहे. स्थानिकांनी स्वच्छतेच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचे आवाहन स्वीकारले आहे. या अभियानाने केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण केली आहे.
अमोल बालवडकर फाउंडेशनचा संकल्प
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जाणारे हे अभियान केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित नसून, गावांना स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणस्नेही बनविण्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवते. प्रत्येक दिवशी नवी ऊर्जा आणि प्रेरणेने हे अभियान पुढे सरकत आहे. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी व्यक्त केलेल्या संकल्पानुसार, म्हाळुंगे गावाला आणि परिसराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा हा प्रवास अखंड सुरू राहणार आहे.






