दीनानाथ मंगेशकर रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत शासकीय अधिकारी यांची नेमणूक करावी : किशोर कांबळे

पुणे : दहा लाख रुपयांची मागणी करत ॲडमीट करून घ्यायला नकार दिल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पुणे शहरात संतापाची लाट आहे. संबंधित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराची व आज पर्यंतच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी व नव्याने सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक त्वरित करण्यात यावी तसेच शासनाने रुग्णालय ताब्यात घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत शासकीय अधिकारी यांची नेमणूक करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी केली.
या संदर्भातील निवेदन किशोर कांबळे यांच्या वतीने धर्मादाय आयुक्त व शंकर गडाळे (अधीक्षक) यांना देण्यात आले असून या संदर्भात कडक कारवाईची मागणी करताना विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यावेळी अजिंक्य पालकर, मयूर गायकवाड, मंगेश जाधव, समीर पवार, केतन ओरसे, संतोष गायकवाड, कुशल मोरे,ऋषीकेश देखणे उपस्थित होते.
देण्यात आलेल्या निवेदनात १) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नवजात बालके आपल्या आईच्या प्रेमाला मुकली त्या कुटुंबाला रुग्णालयाच्या वतीने आर्थिक मदत जाहीर व्हावी. २) दिनानाथ मंगेशकर रुग्णालय येथील घडलेल्या प्रकाराची व आज पर्यंतच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी चौकशीत दोषी आढळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ३) पुणे शहरातील इतरही रुग्णालयाची तातडीने बैठक घेऊन रुग्ण सेवा हेच ध्येय ठेवून कार्य करण्यास सूचना करण्यात यावी. ४) पुणे शहरातील रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता कठोर नियमावली करून सक्षम अधिकारी यांची २४तास नेमणूक त्वरित करण्यात यावी. त्यांचे संपर्क क्रमांक सर्वत्र प्रसिद्ध करावेत.

५) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आजवरच्या सर्व कारभाराची मा.धर्मदाय आयुक्त, पोलीस अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ज्येष्ठ विधी तज्ञ यांच्या समिती नेमून सखोल
चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ६ ) सदर रुग्णालय राज्य शासनाने ताब्यात घेऊन रुग्ण सेवा देणे हे नागरिकांच्या हिताचे आहे. चौकशी पूर्ण होई पर्यंत शासकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी. ७) शासकीय लाभ घेत असलेल्या सुविधांसाठी नियमांची पूर्तता केली आहे का याची चौकशी करण्यात यावी. असे विविध मुद्दे उपस्थित करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
किशोर कांबळे म्हणाले, दीनानाथ मंगेश रुग्णालयात घडलेली घटना म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे. संबंधित महिलेला वेळीच उपचार मिळाले असते तिचे प्राण वाचले असते व तिच्या नवजात बालकांना त्यांची आई मिळाली असती. पण पैशाच्या हव्यासापायी रुग्णालय प्रशासनाने, डॉक्टरांनी केलेला प्रकार त्या पेशाला लाजिरवाणा आहे. अशा लोकांवर कडक कारवाई होणे आवश्यक असून राज्य या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून दोषींना कडक शिक्षा द्यावी.






