सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी; चिथावणीखोर, एकतर्फी चित्रणाचे दिले कारण

मुंबई : मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण असल्याचे कारण देत सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’वर बंदी घालण्यात आली आहे. अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ने 339.49 कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाबाबतच्या अहवालात सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटात मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण आहे. यासोबतच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षात हिंदूंचा होणारा छळही एकतर्फी दाखवला आहे, या गोष्टी नियमांविरुद्ध आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सिंगापूरच्या चित्रपट वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर या कलाकारांचे अभिनय आहेत. हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांवर आधारित असल्याचा दावा करण्यात येतो.




