अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या बाहेर का घेतली जातात ; जेष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांनी सांगितलं कारण..

वारजेत एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रा बाहेर कुठे घेतले की त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. पंजाबमध्ये घुमानला संमेलन झाले तेव्हाही आणि आता दिल्लीत संमेलन होणार असतानाही हे प्रश्न उपस्थित केले गेले, पण बाहेर संमेलन होत असताना त्याला कारणेही असतात. संत नामदेव महाराजांनी आपल्या मराठी संत साहित्याची निर्मिती पंजाब मध्ये केली. तर दिल्लीतून मराठ्यांनी सत्ता राबवली. महादजी शिंदे असे सरदार होते की ते स्वतः कवी होते. त्यांना साहित्याची जाण होती. मराठी भाषेचे धागेदोरे दूरवर आढळतात. आणि म्हणूनच अशा लोकांच्या सन्मानार्थ त्या भागात मराठी साहित्य संमेलन घेतली जातात असे सांगत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनाच्या स्थळावरून निर्माण होणारे प्रश्न निरर्थक असल्याचे सांगितले .
पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि साहित्यिक कट्टा वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने वारज्यातील बाएफ संस्थेच्या डॉ.माणिभाई देसाई सभागृहात आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करताना डॉ. मोरे बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पुणे मनपा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ .माधवी वैद्य, साहित्यिक कट्टा वारजेचे सचिव डी. के . जोशी, प्रसिद्ध चित्रकार रूपेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदिप देशमुख, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, बालसाहित्यिक राजीव तांबे, बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उद्योजक संजय भोर, बालसाहित्यिक राजीव तांबे आणि किर्तनकार आणि वारजेचे माजी उपसरपंच सतिश बोडके यांना अनुक्रमे उद्योगरत्न ,साहित्यरत्न आणि समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुढे बोलताना सदानंद मोरे म्हणाले, कुतुबशाही आणि आदिलशाही सारखी साम्राज्ये नेस्तनाबूत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याकडे वक्रदृष्टी करू पाहणाऱ्या औरंगजेबाला सुमारे २५ वर्षे झुलवत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राखण्यात महादजी शिंदे यांचा मोठा वाटा होता. महादजी शिंदे जसे लढवय्ये होते तसेच ते कवी मनाचेही होते. महादजी शिंदे यांच्या भजन परंपरेत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा उगम आढळतो,



डॉ. मोरे म्हणाले की, आगामी नियोजित साहित्य संमेलन दिल्लीत घेण्यावर काहींनी प्रश्न उपस्थित केले, परंतू ते प्रश्न निरर्थक असून अभिजात दर्जा प्राप्त मराठी भाषेचे धागेदोरे दूरवर आढळतात. संत साहित्य हा सर्व कला -साहित्य प्रकारांचा मूळ स्त्रोत आहे. कला साहित्याचे धागेदोरे धुंडाळयचे झाल्यास त्यांचे मूळ स्त्रोत संत साहित्यात आढळून येतात. संत साहित्याने वारकरी संप्रदाया सोबतच मराठी साहित्यचाही पाया रचलेला आहे . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात मराठी भाषा ही अतिप्राचीन भाषा आहे हा एक आधार होताच, परंतू ज्यावेळी जागतिक पातळीवर अभिजाततेच्या कसोटीवर खऱ्या उतरतील अशी एकही साहित्यकृती युरोपीयन भाषांमध्ये होत नव्हती , त्यावेळी १३ व्या शतकांत ज्ञानेश्वरांनी विपूल ग्रंथनिर्मिती केलेली आढळून येते. भौतिक प्रगती सोबत शारिरिक आणि बौद्धिक प्रगतीत आपण अग्रेसर होतो.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, माझा प्रारब्धावर नितांत विश्वास आहे. आपले पुण्याचे पारडे हे जड असावे लागते तरच आपण चांगली पुस्तके आणि चांगल्या माणसांच्या सान्निध्यात येतो. अशा संमेलनाच्या माध्यमातूनच वैचारिक चळवळ उभी राहते. तसेच साहित्याच्या क्षेत्रात नव्याने प्रयत्न करणाऱ्यांना ही साहित्य संमेलने उपयोगी ठरतात. अशा साहित्य संमेलनाद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली जाते.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनीही अशा साहित्य संमेलनांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी संमेलन आयोजना मागची भूमिका विशद केली. तर पुणे मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले .






संमेलन उद्घाटनापूर्वी शिवचरित्र्यकार ह .भ. प .धर्मराज महाराज हांडे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला. तसेच प्रसिध्द चित्रकार रुपेश पवार यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले .
उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात डॉ .संजय उपाध्ये यांचे ‘मातृभाषा आणि मनःशांती’ या विषयावर व्याख्यान झाले, सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव – कुलकर्णी यांची मसाप कार्यवाह वि . दा . पिंगळे यांनी घेतलेली प्रकट मुलाखत घेतली तर डॉ .मंगला गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेला ‘भाषेसमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात प्रा .मिलिंद जोशी व संजय आवटे सहभागी झाले होते.


