महाराष्ट्र

अंनिस देवा धर्माला विरोध करत नाही : हमीद दाभोलकर

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणत्याही देवा धर्माला विरोध करत नाही. तर देवा धर्माच्या नावाखाली जे लोकांचे मानसिक, आर्थिक शोषण करतात त्यांना विरोध करते. भारतातील बुद्ध, महावीर, वारकरी संत आणि समाजसुधारकांची धर्म चिकित्सेची परंपरा अंनिस पुढे चालवत आहे, असे अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.

इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण झाले. या शिबिराचे उद्घाटन वडाच्या रोपट्याला पाणी घालून डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. दाभोलकर यांनी ‘अंनिस समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न अंनिस करते. आजही समाजामध्ये नरबळी, करणी, भानामतीचे अघोरी प्रकार सुरू असल्याने या समाजात अंनिस चळवळीची नितांत गरज आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एन. डी. पाटील यांच्या नंतर सरोज पाटील (माई) यांच्या अध्यक्षतेखाली अंनिसचे काम महाराष्ट्रभर वाढते आहे. या कामात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन हमीद दाभोलकर यांनी केलं.

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाची मांडणी केली. आर्डे म्हणाले, युरोपियन खंडात नवसुधारणा, विज्ञानाचा प्रचार झाल्यानंतर वैज्ञानिक जाणिवा लोकांच्या मनात विकसित झाल्या. निर्भिडपणे प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे यातून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे युरोपीयन राष्ट्रांनी आपली प्रगती केली आहे. गॅलिलिओ ते डॉ. नरेंद्र दाभोलकर असा मोठा वारसा या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आहे. भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कल्पना मांडून राष्ट्राची उभारणी करण्याचे ठरवले, पण आजचे राज्यकर्ते हे नेहरूंनाच चूक ठरवत आहेत. हे आपल्या देशाला पुन्हा मध्ययुगात नेण्यासारखे आहे.

सध्या देशात धार्मिक कट्टरता वाढविण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या धार्मिक कट्टरतेमुळे आपली शेजारी राष्ट्रे रसातळाला गेली आहेत हे आपण पहात आहोत. तेव्हा भारताने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला तरच देशाची प्रगती होवू शकेल, त्यासाठी अंनिस युवकांना हा दृष्टिकोन देण्यासाठीच अशी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करते, अशी माहिती आर्डे यांनी दिली.

अंनिसचे हे काम कोणत्याही देशी विदेशी वा सरकारी फंडिंग न घेता लोकसहभागातून चालत, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्यकारी सदस्य फारुख गवंडी यांनी अंनिस शाखा कशी चालते? या विषयावर बोलताना दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या कामात क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर नेहमी म्हणायचे याची आठवण त्यांनी करून दिली.

‘अंनिसमध्ये काम करताना कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की असावी. आज चुकीच्या विचारांची पकड समाजावर आहे, ती पकड सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी चिकाटीने प्रयत्न करावेत. चमत्कार सादरीकरण हा लोकांच्यामध्ये जाण्याचा एक प्रमुख मार्ग आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी चमत्कार सादरीकरण सफाईदारपणे केले पाहिजे, त्यामागील वैज्ञानिक सत्य समजून सांगितले पाहिजे,’ असं गवंडी यांनी नमूद केलं.

अंनिसच्या राज्य अध्यक्षा सरोज पाटील म्हणाल्या की, शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी अंनिसने प्रयत्न करावेत. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले की, ‘एन. डी. पाटील साहेबांनी या कॉलेजची पायाभरणी करताना साधा नारळही कधी फोडला नाही. ते म्हणायचे की नारळ फोडून माझी इमारत आपोआप उभी राहील का? बांधकाम मजूर, गवंडी, प्लंबर , इंजिनिअर यांच्यामुळे इमारत उभी राहते. मग कशाला करायचे असले कर्मकांड. कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या एन. डी. सरांचा हा वारसा सरोज पाटील (माई) पुढे चालवत आहेत. बिकट वाट वहिवाट करण्याची एन. डी साहेबांची परंपरा सरोज पाटील (माई) या अंनिसच्या अध्यक्ष पदातून पुढे नेतील असा मला विश्वास आहे. अंनिसचे राज्य अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मी सरोजमाईंचे अभिनंदन करतो.’

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये