राष्ट्रीय

भाजप-मनसेची युती होणार; अमित शहा घेणार पुढाकार?

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती होणार का? हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चिला जात आहे. आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) विस्तार करत त्यात मनसेला सामावून घेण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेसह अनेक प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’च्या छत्राखाली आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात येते.

‘एनडीए’मध्ये सध्या 27 पक्ष आहेत त्यांची संख्या वाढविण्यासाठी पक्षाने ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने एनडीएच्या विस्ताराची ‘आसेतुहिमाचल योजना’ हाती घेतल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात राज ठाकरे, काश्मिरात सज्जाद लोन, पंजाबमध्ये अमरिंदर सिंग, मध्यप्रदेशात गोंडवाना गणतंत्र पक्ष, पश्चिम बंगालमधील ‘भद्र’ समाजावर प्रभाव टाकणारे प्रादेशिक पक्ष यांना ‘एनडीए’बरोबर कायम ठेवण्याचे किंवा जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी लाउडस्पीकरचा मुद्दा हाती घेतला तो दिल्लीपर्यंत गाजत आहे. ठाकरे यांची शैली व यांच्या सभांना जमणारी तुफान गर्दी पाहता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच त्यांना ‘एनडीए’शी जोडून घ्यावे, असा भाजपच्या महाराष्ट्र नेतृत्वाचा आग्रह आहे.

ठाकरे यांना सोबत घेतले तर यूपी-बिहारमध्ये कितपत फटका बसू शकतो याबाबत पक्षाने काही सर्वेक्षणेही केल्याची माहिती आहे. पक्षनेत्यांच्या मते राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेचा विचार करता 2024 आधी त्यांचा ‘एनडीए’तील प्रवेश होण्यात फारसे अडथळे राहणार नाहीत, असे वातावरण आहे. पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी केलेली आघाडी विधानसभेला अपयशी ठरली तरी कॅप्टन यांचा राज्यातील प्रभाव कायम असल्याचे मोदी-शहा यांचे मत आहे. त्यामुळे 2024 मध्येही कॅप्टन अमरिंदर यांच्याबरोबरची आघाडी भाजप कायम ठेवणार आहे. सज्जाद लोन बरोबर आले तर कलम 370 रद्द केल्यावर कायम असलेली खोऱ्यातील धग कमी होऊ शकेल अशी आशा भाजपला आहे. भाजपबरोबर सध्या संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक हे दोनच मोठे पक्ष आहेत. मगोप व रिपब्लिकन आठवले गटासह अन्य प्रादेशिक पक्षही एनडीएचा घटक आहेत. यात उत्तर प्रदेशात निषाद पक्ष व अपना दल, बिहारमध्ये हम, हरियानात दुष्यंत चौताला यांचा जेजेपी, झारखंडमधील आजसू या पक्षांचा एनडीएमध्ये समावेश आहे. 

कॉंग्रेसने आघाडी केली तर…

लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेससह सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आघाडी केलीच तर भाजपला मोठ्या ताकदीने मैदानात उतरावे लागेल. या स्थितीत छोट्या छोट्या पक्षांची मदत भाजपला महत्त्वाची ठरणार आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये