प्रख्यात वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन; भारदस्त आवाज हरपला

पुणे : ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. ते 65 वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. दूरदर्शनमध्ये अनेक वर्षं त्यांनी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं.

1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून काम करायला सुरुवात केली. तसंच कामगार विश्व, इ-मर्क या कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केलं आहे. 1980 मध्ये त्यांनी खार येथे प्रियंका स्टुडिओची स्थापना केली.
मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. प्रदीप भिडे 1974 पासून ते दूरदर्शनमध्ये दाखल झाले. स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्सना किरपेकर हे सगळे त्यांचे समव्यावसायिक होते. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली.
मराठी वाङमय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष ऋची होती. प्रसारमाध्यमातच करिअर करावं असा त्यांचा मानस होता. प्रदीप भिडे यांचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले. त्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. तिथे विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर रानडेमधून त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
“बातमी वाचताना सरळसोट वाचली तर नीरस आणि परिणामशून्य होते यासाठी शब्द भांडार हवे, बालसुलभ कुतुहुल हवं. बातम्या तटस्थपणे, पण आवाजात आवश्यक तो चढउतार, मार्दव, निर्माण करून सादर केल्या तर परिणामकारक होतात,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यांनी तब्बल 25 वर्ष वृत्तनिवेदन केलं.
मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.






