ऐन दिवाळीत महापालिकेतील कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक स्वच्छता विभागात ३५०० कंत्राटी कामगार आहेत. दरवर्षी या कंत्राटी कामगारांना संबंधीत कंत्राटदाराने दिवाळीत बोनस अदा करण्यात यावा म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून परिपत्रक काढले जाते. पण प्रत्यक्षात सदर परिपत्रकानुसार ठेकेदार कंत्राटी कामगारांना बोनस देत नाहीत. त्यामुळे यंदा बोनस मिळाला नाही तर एन दिवाळीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणे महानगरपालिका कामगार युनियन च्या वतीने देण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी संबंधीत ठेकेदार करत नाहीत यामुळे कंत्राटी कामगारांची सर्रास आर्थिक फसवणूक होऊन खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. आणि महानगरपालिकेने ही बोनसची रक्कम ठेकेदारांना दिलेली असते, त्यामुळे ही महानगरपालिकेची सुद्धा फसवणूक असल्याचे युनियनने म्हंटले आहे.
कोविड १९ च्या महामारीच्या कालखंडात कंत्राटी कामगारांनी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्ये पार पाडली आहेत. तर काही कामगार कोरोनाग्रस्त होऊन मृत्युमुखी पडले आहेत. त्यांना देखील कोणताही प्रकारची आर्थिक मदत व वारसांना नोकरी दिली नाही. तसेच टेंडरच्या अटीशर्तीला अनुसरून त्यांना सुरक्षेची कोणत्याच प्रकारचे सुरक्षा साधणे, गणवेश, दवाखान्याच्या सुविधा, वेतन चिठ्ठ्या देखील दिल्या जात नाहीत. संबंधीत ठेकेदार कागदोपत्री सर्व साधने उपलब्ध करून दिली जात आहेत असे दाखवतात पण प्रत्यक्षात कामगारांना काही दिले जात नाही. असे प्रत्यक्ष दर्शनी युनियनच्या निदर्शनात आले आहे.
यानुसार प्रशासना बरोबर युनियनने अनेक वेळा लेखी स्वरूपात निवेदन व पत्रव्यवहार करून देखील प्रशासन कंत्राटी कामगारांच्या अनेकप्रश्नांच्या संदर्भात गांभीर्याने दखल घेत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांत असंतोष पसरला आहे. प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या बोनस सहीत सर्व प्रश्नांच्यासंदर्भात वेळीच दखल घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर ऐन दिवाळीत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येतील असा इशारा युनियनचे अध्यक्ष काॅ. उदय भट व जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.



