कोल्हापूरमधील दाजीपूर अभयारण्य विकासाला २५ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगाने शिवसेना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ₹ २५ कोटी देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळून पर्यटकांचा ओघ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.

राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापुर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे. हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले होते. या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत.





















