राणेंना धक्का; कुडाळमध्ये 2 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसचा नगराध्यक्ष

सिंधुदुर्ग : राज्यभर चर्चेचा विषय झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना 9, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय झाला आहे, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे.
चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळमध्ये झेंडा रोवल्याने राणेंना हा धक्का मानला जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेनं दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला. कुडाळमध्ये एकूण 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते.

दरम्यान, संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आणि आ. नितेश राणे यांचे खंदे समर्थक संदेश उर्फ गोट्या सावंत यांची कणकवली न्यायालयात शरण आला आहे. 7 तारखेला सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळत त्यांना अटकेपासून दहा दिवसांचं संरक्षण देऊन जामीनासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गोट्या सावंत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले.



