
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 75.29 टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात 301 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचं राजकीय भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या सर्व 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. निकाल हा 10 मार्चला लागणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.44 टक्के मतदान झाले आहे. उत्तराखंड येथे 59.37 टक्के मतदान झालेले आहे.

निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज गोव्यातील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी मुख्य सामना हा काँग्रेस आणि भाजपमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी निवडणुकीत भाजपला 22 जागा मिळतील, असा दावा केला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (GFP) यांचा समावेश आहे. सुदिन ढवळीकर (MGP), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
गोव्यात गेल्यावेळी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. काँग्रेसने निवडणुकीत 17 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 13 आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP)ने 3 जागा जिंकल्या होत्या.



