राजकीय

मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील भाजपच्या ‘डर्टी डझन’मध्ये; शिवसेनेचा आरोप

मुंबई : पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपाचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं पुण्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला डिवचलं आहे. चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात हे लवकरच कळेल, असंही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपावाले तोंड का उचकटत नाहीत? भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळयांचा समावेश आहे काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

”महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल. पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

दरेकरांनी तर मुंबई बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल! राज्य गमावले म्हणून शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची हिंमत दाखवा. चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजप आता पूर्वीची राहिलेली नसून शिवसेनेला पुरून उरेल. पाटील म्हणतात ते खरेच आहे. भाजपपूर्वी पाठीमागून वार करणारी होती व आता तिचे रूपांतर शिखंडीत झाले आहे. हा बदल तर दिसतोच आहे. पुरून उरण्याची भाषा कसली करता? भविष्यात तुम्हीच किती उरताय ते पहा. युद्धाला युद्ध म्हणायचे असेल तर समोर या आणि लढा. केंद्रीय तपास यंत्रणांचा बळजबरी वापर म्हणजे युद्ध नव्हे,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

शिवसेनेनं भाजपची तुलना तालिबानशी केलीय. भाजपने भ्रष्टाचाराविरोधात बोलणं म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखं असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय. ”भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे,” असा टोला शिवसेनेनं ‘सामना’च्या ‘शिखंडीचे युद्ध’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून लगावलाय.

Img 20220225 wa00038702747946855041624

इतिहासातला सगळ्यात मोठा बँक घोटाळा गुजरातमधील ऋषी अगरवाल या माणसाने केला व तो आजही मोकळाच आहे. केंद्रीय मंत्री राणे यांच्या शंभर बोगस कंपन्यांतून मनी लॉण्डरिंग कसे झाले ते सर्व पुरावे किरीट सोमय्या यांनीच ‘ईडी’कडे नेऊन दिले व राणेंच्या अटकेची मागणी केली. त्यावर चंद्रकांत पाटील, फडणवीस व भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे इतर शिखंडी गप्प का? केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे झाली आहेत व देशाला त्यापासून धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिखंडी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत, पण या शिखंडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याचीही गाठ सुटू शकते हे त्यांनी विसरू नये,” असं लेखात म्हटलंय.

विरोधात बोलणाऱ्यांचे संबंध दाऊदशी जोडायचे, मनी लॉण्डरिंगची खोटी प्रकरणे बनवायची, त्यांची यथेच्छ बदनामी करायची हेच सुरू आहे. कारण हे करणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही, दंडावरील बेडक्यांत जोर नाही. शिखंडीला पुढे करून युद्ध करायचे. हिंमत असेल तर निधडय़ा छातीने पुढे या. आहे हिंमत?,” असा प्रश्न शिवसेनेने लेखाद्वारे भाजपला विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये