महाराष्ट्र

पोहरादेवीचे महंत सुनील महाराज शिवबंधनात

मुंबई : संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांच्या हाती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराजांना शिवसेनेत आणून संजय राठोड यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान उभे केल्याचे म्हटलं जातं आहे.

बंजारा समाजावर या महंतांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड यांच्याविरोधात महंत सुनील महाराज यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदावरुन संजय राठोड यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राठोड यांचा समावेश पुन्हा मंत्रिमंडळात व्हावा, यासाठी सुनील महाराजांनी मुंबईत अनेकांच्या राजकीय गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी बंजारा समाजाच्या महंतांनीही आपली ताकद संजय राठोड यांच्या पाठिशी उभी केली होती. अखेर शिंदे गटात सामील झाल्यानंतर संजय राठोड यांना तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात क्लीनचिट मिळाली होती. याशिवाय, त्यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात अन्न आणि औषध प्रशासन खाते देण्यात आले होते. परंतु, यानंतर महंत सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज हे काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी संजय राठोड यांनी त्यांना चार तास वाट पाहायला लावली होती. त्यानंतरही संजय राठोड सुनील महाराज यांना अवघ्या १० मिनिटांसाठी भेटले. त्यांची देहबोली आणि त्यांच्या वागण्यावरून मी आलेलो त्यांना फारसे आवडले नसल्याची प्रतिक्रिया सुनील महाराज यांनी दिली होती.

सुनील महाराज काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधलंय. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेनाच काम करु शकते, असा माझा दृढविश्वास आहे. ज्यांच्यासोबत आम्ही होतो, त्यांनी वेगळा मार्ग निवडला. पण सारासार विचार करुन मी शिवसेनेचा भगवा हाती घ्यायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करतायेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करु, असा निर्धार सुनील महाराज यांनी बोलून दाखवला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले

“बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. पण काही लोकांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. ते न आवडल्यानेच आज सुनील महाराज शिवसेनेत आले आहेत. लढवय्या समाज माझ्यासोबत आहे. लढाई लढताना-संघर्ष करताना सोबत आलेल्या मावळ्यांचं महत्त्व अधिक असतं”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी महंत सुनील महाराज यांचं महत्त्व अधोरेखित केलं. तर लवकरच मी पोहरादेवीला जाऊन देवीचं दर्शन घेईल. राठोडांना शह वगैरे देण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेचं काय होणार? असा ज्यांना ज्यांना प्रश्न असेल त्याचं उत्तर हे आहे की शिवसेना १० पावलं पुढे आहे. मी शह द्यायच्या भानगडीत पडत नाही. मला पुढे जायचंय, पण लवकरच महाराष्ट्र दौरा करुन पुढचं प्लॅनिंग सांगतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सुनील महाराज शिवसेनेत का?

सुनील महाराजांना वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात किंवा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. या आधी त्यांनी स्वतःला बंजारा नेता म्हणून राज्यसभेवर किंवा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर घेण्याची उद्धव ठाकरेंकडे मागणी केली होती. सध्या वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी शिंदे गटात गेल्या आहेत, तर कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटणी हे भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांना शिवसेना पक्ष सोयीचा वाटतो, तर संजय राठोड यांच्या सारखा मोठा बंजारा नेता उद्धव ठाकरेंना सोडून गेल्याने बंजारा वोट बँक पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून सुनील महाराजांना बळ दिलं जातंय.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये