मिठाई व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून व्यवसायवृद्धी करावी-खाद्य तथा अन्न औषध प्रशासनाचे संयुक्त आयुक्त सुरेश अन्नपुरे यांचे आवाहन
मिठाई फरसाण डेअरी असोसिएशन (MFDA) ची फुड सेफ्टी व साइबर सेफ्टी कार्यशाळा संपन्न
पुणे : सर्व प्रकारच्या मिठाई व्यावसायिकांनी जास्तीत जास्त फूड सेफ्टीचा अंगीकार करीत आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच नवीन खाद्य सुरक्षा कायद्यात झालेल्या बदलांची काटेकोर माहिती ठेवून आपला व्यवसाय करावा. त्यातूनच आपल्याला व्यवसायाची चांगली वाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे खाद्य तथा अन्न औषधि प्रशासनाचे संयुक्त आयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले.
मिठाई फरसाण डेअरी असोसिएशन (MFDA) ची फुड सेफ्टी व साइबर सेफ्टी कार्यशाळा शुक्रवार २० सप्टेंबर रोजी टिळक रोडवरील आयएमए हाॅलमध्ये उत्साहात पार पडली. त्या वेळी मार्गदर्शन करताना सुरेश अन्नपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चितळे फुड्सचे संजय चितळे हे होते. या वेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा तज्ञ शिरीश देशपांडे यांच्यासह संघटनेचे सचिव अमित अग्रवाल, कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलताना सुरेश अन्नपुरे पुढे म्हणाले की, मिठाई फरसाण आणि डेअरी व्यवसायिकांनी सातत्याने आपला खाद्य दर्जा सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ज्या ठिकाणी आपण मिठाई व खाद्य पदार्थ बनवतो, त्या ठिकाणची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे आरोग्य व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याची विशेष काळजी घ्यावी. पॅकेजिंगच्या खाद्यपदार्थांसंदर्भात फुड ग्रेडचा स्तर नेहमीच उच्च ठेवावा. प्राॅडक्ट्सवर मॅन्युफॅक्चरिंग व बेस्ट बिफोर ची आवर्जून नोंद करावी. या सर्व बाबी आपल्या व्यवसायवाढीसाठी पूरक ठरतात. कुठलीही समस्या आली तर अन्न व औषधी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा व आपल्या समस्योची सोडवणूक करा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेत सायबर सुरक्षा तज्ञ शिरीष देशपांडे यांनी मोबाईल बँकिंगमध्ये होणारे फ्राॅड, फेक लिंक किंवा ई-मेलद्वारे होणारी फसवणूक याविषयी सविस्तर माहिती दिली. कुठल्याही अनोळखी लिंक वर क्लिक करू नका किंवा कोणालाही आपला पासवर्ड, ओटीबी देऊ नका असे आवाहन करीत त्यांनी आजवर विविध ठिकाणी झालेल्या गंभीर फ्राॅडची माहिती उपस्थितांना करून दिली. आर्थिक व्यवहार करताना किंवा बँकिंग ट्रॅजॅक्शन करताना घ्यावयाची काळजी तसेच सोशल मीडियातील फ्राॅडपासून कसे वाचावे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन दिले.
कार्यशाळेला पुणे गॅसच्या वतीने विशेष सहकार्य देण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित अग्रवाल यांनी केले, तसेच आभार मकरंद गाडवे यांनी मानले.कार्यशाळेला पुणे शहर व जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मिठाई फरसाण व डेअरी व्यावसायिक उपस्थित होते. अशाप्रकारच्या कार्यशाळा सातत्याने घ्याव्यात व आपली संघटना मजबूत करावी, अशी अपेक्षा कार्यशाळेला आलेल्या मिठाई, फरसाण व डेयरी व्यावसायिकांनी व्यक्त केली.