नावाप्रमाणे कार्य करत सामाजिक कर्तव्य पार पाडणारे गणेशनगर मधील देशप्रेमी मित्र मंडळ..
कोथरूड : एरंडवणा गणेशनगर मधील देशप्रेमी मित्र मंडळ नावाप्रमाणेच देशा प्रती आपले कर्तव्य बजावत आले आहे. विविध उपक्रमांतून सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना मंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. मार्गदर्शक मंदार बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी मंडळाच्या नावाला साजेसे काम करत वाटचाल करत आहेत. यंदा मंडळाचे ३९ वे वर्ष आहे. मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई असलेला महल देखावा सादर केला आहे.
राज्यात कधी आपत्कालीन परिस्थितीत उद्भवली असेल किंवा काही भागात दुष्काळ पडला असेल, आरोग्य विषयक सेवा पुरवायची असेल तर अशा वेळी मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी जनतेच्या मदतीला धावून गेलेले आहेत. नगर जिल्ह्यात दुष्काळ पडला असताना त्या भागातील निमगाव धामण हे गाव दत्तक घेऊन तेथील नागरिकांना तीन महिने पुरेल एवढे अन्न धान्य मंडळाकडून पुरवले गेले होते. या मदतीने दुष्काळाने होरपळलेल्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यावेळी प्रसार माध्यमांनीही मंडळाच्या या कामाचे कौतुक केले होते. कोरोना संकट काळातही मंडळाकडून गरजू कुटुंबांना अन्न धान्य, भाजीपाला तसेच आरोग्य साहित्य मोफत पुरवण्याचे काम करण्यात आले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम त्यावेळी केले.
सामाजिक कर्तव्य पार पाडत असताना हिंदू धर्माची परंपरा तसेच महाराष्ट्राची कला, संस्कृती जपली गेली पाहिजे ती पुढील पिढी पर्यंत पोहचली पाहिजे यासाठी सातत्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदार बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. रोजच्या कामाच्या व्यापात महिलांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत म्हणून महिलांसाठी महाभोंडल्याचे आयोजन, भोंडल्या सोबतच खिरापत ओळखा स्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा व उखाणा स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि यात परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा ठरलेला असतो. जागतिक मातृ दिनानिमित्त मातृ गौरव सोहळ्याचे आयोजनही मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
पुस्तक दहीहंडी सारखा अनोखा उपक्रम सर्वप्रथम राबवून मंडळाने एक अनोखा पायंडा पडला आणि आज त्याचे अनुकरण अनेक जण करत आहेत. या पुस्तक दहीहंडीत जमा झालेली पुस्तके सामाजिक संस्थेस, शिक्षण संस्थेस भेट म्हणून देण्यात आलेली आहेत. दिवाळी मध्ये द म्युझिशियन्स या कार्यक्रमाचे आयोजन करून संगीतप्रेमी मंडळींना एक अनोखी भेट मंडळाच्या वतीने देण्यात आली होती. या कार्यक्रमात झी सारेगमप मधील वादकांच्या ताल वाद्यांच्या जुगलबंदीची आठवण आज ही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. असे अनेक उपक्रम राबवत देशप्रेमी मंडळ समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत आहे. या वर्षी मंडळाचे अध्यक्ष दिपक विश्वकर्मा हे आहेत.
१९८५ साली माझे वडील कै. शेखर अण्णा बलकवडे यांनी देशप्रेमी मंडळाची स्थापना केली. तेव्हा पासून आजपर्यंत मंडळ सामाजिक कामात आग्रेसर आहे. विविध उपक्रमांतून मंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. मंडळ राबवत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमात मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने सहभागी होऊन काम करत असतात.
– मंदार बलकवडे ( मार्गदर्शक देशप्रेमी मित्र मंडळ)