वाढपी म्हणून काम करणारा, रस्त्यावर शर्ट विकणारा झाला चित्रपट निर्माता.. वारजेतील तरुणाची थक्क करणारी यशोगाथा

वारजे : प्रयत्न, जिद्द सोडली नाही आणि ध्यय ठेवून काम केले तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश संपादन करू शकता हे वारजेतील राजीव पाटील यांनी जगाला दाखवून दिले आहे. लग्नात वाढपी च्या केलेल्या कामापासून मराठी चित्रपट निर्मात्यापर्यंत केलेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अभिनयाची आवड असल्याने पाटील हे दिशक्याव या चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही प्रवेश करत आहेत.
प्रीतम पाटील दिग्दर्शित दिशक्याव हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या पुण्यातील वारजे माळवाडी येथील एक नवा चेहरा राजीव पाटील निर्माता आणि अभिनेता म्हणून या सिनेमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकणार आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम केले पण हार मानली नाही. कष्ट करायचे आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करायच्या ही खूणगाठ मनाशी बांधूनच काम करत राहिलो. कोणत्याही कामाला लाजलो नाही. प्रसंगी लग्नात जेवण वाढण्याचे काम केले, रस्त्यावर पेरू विकले, रस्त्यावर शर्ट विकले, पेपर टाकले, सुरक्षा रक्षक म्हणून काम केले. अशी अनेक कामे न लाजता केली, आणि म्हणूनच आज इथपर्यंत पोहचलो असल्याचे पाटील सांगतात.
लग्नात जेवण वाढण्यापासून केलेली सुरवात आज मराठी चित्रपटाचा निर्मात्यापर्यंत घेऊन आली. अभिनयाची आवड असल्यामुळे मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मनाला समाधान वाटत आहे. मला मिळालेले हे यश माझ एकट्याच नाही. आयुष्यात ज्या ज्या लोकांनी मला कामाची संधी दिली त्या सगळ्यांचा या यशामध्ये सहभाग आहे अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन मदत केलेल्या कोणालाच ते विसरले नाहीत तर त्यांच्या मदतीची जाणीव ठेवली आहे हेच त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे.

फळ विकण्यासाठी माझा वर्ग मित्र वैभव शीतकल याने दिलेली सायकल, रामदास मोरे यांनी शर्ट विकायला मोफत दिलेली त्यांच्या दुकानासमोरची जागा, हर्षादाताई रमेशभाऊ वांजळे, सायली ताई वांजळे यांनी केलेलं मार्गदर्शन, दत्ता झंजे यांची साथ असेल, शरदआबा बराटे यांनी दिलेली संधी असेल ह्या सर्वांचा खूप मोठा वाटा माझ्या यशात आहे. मिळालेल्या यशामुळे त्या कष्टाच चीज झालं आहे. ढीशक्याव चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल याची खात्री आहे. मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात आवर्जून जावे असे आवाहन राजीव पाटील यांनी केले.