केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होणार ? राजकीय वातावरण तापले ; राणे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर..

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पातळी सोडून टीका केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटले आहे. हे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता नारायण राणे यांना अटक करण्याची तयारी नाशिक पोलिसांनी केली असून त्यासाठी पथक रवाना झाले आहे. Central Minister Rane to be arrested? Political atmosphere heats up,
नारायण राणे काय म्हणाले होते?
जनआशीर्वाद दरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी
बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
राणे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून नारायण राणे यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.




