‘मन की बात’मुळे पंतप्रधान मोदी देशवासियांच्या मनामनांत : पालकमंत्री पाटील

– ‘मन की बात’च्या १०० व्या भागाला नागरिकांचा उत्स्फूर्त
– भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन
पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण कारकिर्दीत सामान्य लोकांशी संवाद कायम ठेवला असून आजवरच्या पंतप्रधानांपेक्षा देशात आणि जगात जास्त भ्रमण करूनही त्यांचा लोकसंवाद कायम राहिला. यात ‘मन की बात’ या संवादाचा मोठा वाटा असून आजवर हा संवाद ९६ कोटींपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचला आहे आणि म्हणूनच पंतप्रधान मोदी देशवासियांच्या मनामनात आहेत’, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा शतकीय भाग सामूहिकरीत्या पाहण्याची व्यवस्था कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’च्या प्रत्येक भागात देशाला संबोधित करताना विविध विचार दिले. ज्याचे नंतर शब्दशः चळवळीत रुपांतर झाले. देशाला नव्याने दिशा मिळाली. हेच प्रेरणादायी विचार एकत्रितपणे नागरिकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने नाट्यगृहाच्या परिसरात ९९ भागांची प्रदर्शनी भरवण्यात आली, याचे उद्धाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘३ ऑक्टोबर २०१४ विजयादशमीपासून पंतप्रधान मोदी यांनी मन की बात अखंड सुरु ठेवली आहे, हे मोठे यश आहे’.
संयोजक मोहोळ म्हणाले, पंतप्रधानांचा संदेश अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तसेच जनतेचा थेट देशाच्या पंतप्रधानांशी संवाद हे केवळ ‘मन की बात’ या कार्यक्रमामुळे शक्य झाले. ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे स्वच्छ अभियानाची घातलेली साद असो, कोरोना काळात लसीकरणाची साद असो, बेटी बचाओ- बेटी पढ़ाओ अभियान असो किंवा मग स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव असो, या सर्वांना देशाच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला’.



‘मन की बात’ या देश हिताच्या उपक्रमाने आज शंभरीचा टप्पा गाठला. ही प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमाचा दुवा होण्याचे भाग्य लाभले, यातच फार मोठे समाधान आहे’, असेही मोहोळ म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘महानायक सावरकर’ ही अनोखी सांगीतिक मैफल राहुल देशपांडे, सावनी रवींद्र, प्रसनजीत कोसंबी या दिग्गज कलाकारांनी सादर केली.
मोदीजींनी आजवरच्या ‘मन की बात’ संवादात उल्लेख केलेल्या पुण्यातील व्यक्तींचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यात सीओईपीचे कुलगुरु सुधीर आगाशे, प्रयोगशील शेतकरी राजेश माने, बॅाक्सिंग खेळाडू आणि प्रशिक्षक आकाश गोरखा, कोरोना संकटकाळात आरोग्यसेवा सक्षमपणे पुरवणारे डॅा. रोहिदास बोरसे, ज्ञानप्रबोधिनीचे प्रज्ञा प्रभूदेसाई-अक्कलकोटकर आणि स्वप्निल इंदापूरकर यांचा गौरव केला.



