सूरजनगर हौसिंग सोसायटीची पुनर्विकासानंतरची वास्तू कोथरूड आणि पुणे शहराच्या वास्तू वैभवात भर पाडेल : अजित पवार

साई असोसिएट्सच्या सूरजनगर हौसिंग सोसायटी पुनर्विकास बांधकाम प्रकल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन..
पुणे कोथरूडमध्ये साई असोसिएट्सच्या वतीने साकारण्यात येत असलेली सूरजनगर हौसिंग सोसायटीची पुनर्विकासानंतरची वास्तू दर्जेदार व कोथरूड आणि पुणे शहराच्या वास्तू वैभवात भर पाडणारी अशीच असेल असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.
कोथरूड मध्ये साई असोसिएट्सच्या वतीने साकारण्यात येत असलेल्या सूरजनगर हौसिंग सोसायटीच्या भव्य पुनर्विकास बांधकाम प्रकल्पाचे उद्घाटन आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साई असोसिएट्सचे प्रमुख शंकर केमसे, व्यंकटेश ग्रुपचे अंकुश अजबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अभिजित केमसे, अभिनेते किरण गायकवाड, प्रशासकीय अधिकारी, मीनाक्षी शेंडकर, मीनाक्षी राऊत, सुरजनगरचे अध्यक्ष प्रविण परुळेकर व इतर कमिटी सदस्य, सभासद उपस्थित होते. यावेळी दमयंती राजपाल राऊत लिखित मुन्सिपल कॉर्पोरेशन स्कूल प्रोग्रेस अँड प्रॉस्पेक्ट्स या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अजित पवार म्हणाले, पुनर्विकास गृह प्रकल्प राबवताना अनेक अडचणी येतात पण त्या अडचणींवर मात करत सर्व सभासद एकत्र आल्याने असे गृहप्रकल्प उभा राहत असतात. शंकर केमसे हे जरी राजकीय पदाधिकारी असले तरी त्यांचा बांधकाम व्यवसाय हा मूळ व्यवसाय असून त्यांनी अनेक दर्जेदार गृह प्रकल्प कोथरूड आणि परिसरात उभे केले आहेत. त्यांनी एक विश्वास सार्हता जपली आहे. कमी वयात वडिलांचे निधन झाल्यानंतर जबाबदारी काय असते याची जाणीव त्यांना आहे. आईने त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. कष्टातून ते पुढे आले आहेत.
सुरज नगरच्या पुनर्विकासाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. ते हे काम नियोजित वेळेत पूर्ण करतील कामाचा दर्जा उत्कृष्ट राहील याची खबरदारी घेतील, नवीन सोसायटी आकर्षक आणि सोयीसुविधांनी परिपूर्ण व कोथरूडच्या वास्तू वैभवात भर घालणारी करतील याचा मला विश्वास आहे. सभासद आणि विकसक यांच्यात योग्य समन्वय असेल तर अनेक अडचणींवर मात करत एक चांगला प्रकल्प उभा राहू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल असे पवार म्हणाले.












पुनर्विकास प्रकल्प
शंकर केमसे म्हणाले, अजितदादा माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळे मी प्रगती करून शकलो. मला कधीही काही अडचण आली तर दादांची साथ मला कायम मिळाली. मी इथपर्यंत पोहोचलो आहे ते माझ्या आईमुळे, आईचे आईच्या आशीर्वाद नसते तर मी घडलो नसतो. तिने धुणीभांडी करून शिकवले आणि संस्कार केले त्यामुळे मी आज इथे आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करेल असा मी सुरजनगरच्या सर्व सभासदांना अजितदादा आणि माझ्या आईच्या साक्षीने शब्द देतो. दादांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे त्यामुळे माझी जबाबदारी वाढलेली आहे. येथील सभासदांचे नवीन अत्याधुनिक घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.
यावेळी सुरजनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण परुळेकर यांनी सोसायटी स्थापनेपासून ते इथपर्यंतची वाटचाल कशी झाली. काय अडचणी आल्या शंकर केमसे यांची कशी साथ मिळाली याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.



