पुणे शहर

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये खंडणी वसूल करणाऱ्यांवर मोक्का

पुणे : विमाननगर येथील फिनिक्स मॉल येथे व्यापाऱ्यांकडून खडणी वसूल करणारा सराईत गुन्हेगार रवींद्र ससाने याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई केली आहे. रवींद्र ससाने हा पुणे शहर पोलिसांच्या पूर्व रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार असून माथाडीच्या नावाखाली फिनिक्स मॉल येथील व्यापाऱ्यांकडून तो व त्याचे साथीदार लाखो रुपयाची खंडणी वसूल करत होते. 

याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे दोन व खंडणी विभागाने एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची दखल घेऊन पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा यांना सदर गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी असा प्रस्ताव सादर केला होता.

सराईत गुन्हेगार व या टोळीचा प्रमुख रवींद्र जयप्रकाश ससाने, मंगल रमेश सातपुते तसेच दीपक संपत गायकवाड या तिघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम१(ii),३(२),३(४) प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. विमाननगर येथील फिनिक्स मॉल या ठिकाणी 200 हून अधिक व्यापारी संकुल व दुकाने आहेत. मागील अनेक वर्षांपासून रवींद्र ससाणे हा टोळीतून निलंबित करून देखील त्यांच्या टोळीतील नातेवाईकांच्या मदतीने बळजबरीने माथाडीच्या नावाखाली व्यावसायिकांकडून लाख रुपये खंडणी वसूल करत होता. सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्या दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी व्यापारी पुढे येत नव्हते. मात्र विमानतळ व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या सराईत गुन्हेगार टोळीवर खंडणीचे तीन गुन्हे दाखल केले. त्यानुसार ही मोकातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी माथाडी टोळीवर मोक्कांतर्गत केलेल्या कारवाईमुळे पुणे शहरातील खंडणीखोर माथाडीतील गुन्हेगार यांचे धाबे दणाणले आहेत. फिनिक्स मॉल येथील माथाडीचे नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्या सराईत इतर आरोपींचा देखील शोध सुरू असून या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढू शकते.पुणे शहरातील माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये