मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केलं अन् भाजपने युती तोडली; संजय राऊतांचं मोठं विधान
मुंबई : 2014 आणि 2019 भाजप शिवसेनाची युती का तुटली यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. 2019 ला जेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली तेव्हा उद्धवजींनी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं. एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केल्यामं भाजपने युती तोडली, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचंही संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. तर सामनातील अग्रलेखावरही राऊतांनी भाष्य केलं आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करण्यात आली आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यावर बोलताना आम्ही फडणवी यांच्या टीका केली नाही. तर उलट फडणवीस हे सद्गृहस्थ असल्याचं म्हटलं, असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे जुन्या भाजपचे नेते आहेत. ज्या भाजपचा उल्लेख नितीन गडकरी यांनी केला आहे. आम्ही फक्त त्यांना आरसा दाखवला आहे. फडणवीस म्हणाले की, आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याला आम्ही आरसा दाखवला. त्यांना आम्ही सांगितलं की बेईमानी केली नाही तर तुमच्या वरिष्ठांनी बेईमानी केली. आज तुम्ही जो ड्युप्लिकेट माल घेऊन बसला आहात ती बेईमानी आहे. 2014 आणि 2019 तुम्ही बेईमानी केली म्हणून तुमच्यावर ही वेळ आली की या बनावट लोकांना सोबत घ्यायची, असं संजय राऊत म्हणाले.
2014 ला कुणी युती तोडली. यावर एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. आता 2019 कुणी युती तोडली हे आम्ही सांगितलं आहे. आम्ही भाजपला आरसा दाखवला आहे. आम्ही असं कुठं म्हणालो की हा देवेंद्र फडणवीस यांचा अपराध आहे म्हणून? तुमचे वरिष्ठ शब्दाला जागले नाहीत. त्यांनी शब्द राखला नाही. युती तोडली म्हणून ही वेळ आली आणि नितीन गडकरी यांनी नेमकं हेत भाष्य केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आमचं दुकान सध्या चांगलं चाललं आहे. पण यात सध्या नवीन ग्राहकच जास्त आहेत, असं नितीन गडकरी म्हणालेत. बुलढाण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी यांचं कौतुक. त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत केली. आम्ही जे बोलत आलो आहोत. तेच गडकरी बोललेत, असं संजय राऊत म्हणालेत.