केतकी चितळेवर गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे संकेत

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेसह वकील नितीन भावे आणि निखील भामरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हे सगळं ठरवून जाणूनबुजून होत असल्याने कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर येथील सायबर सेलला तक्रार दाखल करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट तसेच संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची छेडछाडौ केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.
केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे. केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केली. या पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तिने समाजात द्वेष, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे, असे याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.




