नायलॉन मांजामुळे अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी; गळ्याला 10 टाके

पुणे : अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा नायलॉनच्या मांजाने गळा कापला आहे . सुदैवाने ते बचावले असून त्यांच्या गळ्याला दहा टाके घालण्यात आले आहेत. नवनाथ मांढरे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना समोर आली आहे.
मकरसंक्रांतीला बंदी असतानाही नायलॉन मांजा वापरले जातात. त्यामुळे पक्षी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक विक्रेते मोठ्या प्रमाणात नायलॉन मांंजाची विक्री करत असतात. पतंग दूरपर्यंत उडतो अशी अनेकांची समजूत आहे. त्यामुळे अनेक हौशी नायलॉन मांजाचा वापर करतात. मात्र या मांज्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
अग्निशमन दलाचे कर्मचारी नवनाथ मांढरे हे मंगळवारी दुपारी दोन वाजता भवानी पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्रात आले होते. त्यानंतर त्यांना ड्युटीसाठी कोंढवा येथे पाठवण्यात आले. ते कोंढवा येथे जात असताना डायस प्लॉट येथील नवीन उड्डाणपुलावर त्यांची दुचाकी आली असता त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. गाडी थांबवेपर्यंत त्यांचा गळा कापला. त्यांच्या गाडीचा वेग कमी असल्याने ते थोडक्यात बचावले. यानंतर त्यांनी याबाबत अग्निशमन कर्मचारी गणेश ससाणे यांना फोन करुन सांगितले. त्यांनी लगेच ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे धाव घेतली. त्यांनी मांढरे यांना तातडीने बिबवेवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्यावर दहा टाके घालण्यात आले आहेत.




