स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर; महापालिका निवडणुका कधी? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित

नवी दिल्ली : राज्यातील महापालिका निवडणुकांचं भवितव्य निश्चित करणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी पुढच्या महिन्यात म्हणजेच, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. आज सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे प्रकरण लिस्ट करण्यात आलं होतं.
आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील हे प्रकरण मेन्शन केलं गेलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यास सांगितलं आहे. महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याचं उत्तर या सुनावणीवर अवलंबून आहे. 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही याच याचिकेत समाविष्ठ आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
याप्रकरणी डिसेंबरमध्ये शेवटची सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 17 जानेवारी 2023 रोजी प्राधान्यानं ऐकलं जाईल, असं सांगितलं होतं. मात्र काल (मंगळवारी) ही सुनावणी झाली नाही. काल घटनापीठाचं कामकाज खूप लांबल्यामुळे या सुनावणीवर त्याचा परिणाम दिसून आला. त्यानंतर आज या प्रकरणाचा कोर्टाच्या कामकाजात समावेश करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असं सांगण्यात आलं.




