Karnataka Assembly Election 2023 Results Live : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. 137 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं उघडली गेली आहेत. हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलशाहीची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या गरीब जनतेच्या शक्तीने भांडवलशाहीचा पराभव केला, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विजयावर दिली आहे.

जनतेने आम्हाला विजयी करून एका भ्रष्ट सरकारचा पराभव केला आहे. आम्हाला पुढे खूप काम करायचं आहे. आम्ही जी आश्वासनं दिली ती आम्ही पूर्ण करू, असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे. “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे. मी सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन.” असे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार पक्षनिहाय आघाडी
काँग्रेस – १३५ (विजय – ५५)
भाजपा -६५ (विजय – २२)
जेडीएस – १० (विजय)
इतर – ०४ (विजय – २)






