कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने “२५ जानेवारी मतदान दिन” साजरा…..!

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने लोकशाहीच्या सबलीकरणासाठी २५ जानेवारी हा दिवस “मतदान दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
लोकशाही बळकट करण्यासाठी या मतदान दिनाचे महत्व नविन व तरुण नागरिकांना कळावे याकरिता जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम प्रभाग क्रं १०, ११, १२, या तीनही प्रभागात राबवण्यात आला. विशेषतः डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, शिवाजी पुतळा चौक, कर्वे पुतळा चौक, भेलकेनगर चौक, बधाई चौक, आशिष गार्डन, कुमार परिसर, सुतार दवाखाना परिसर, आयडियल कॉलनी, मयूर कॉलनी, मोरे विद्यालय, शिक्षकनगर, भुसारी कॉलनी परिसरात जाऊन नवीन मतदारांनी मतदान यादीत नावे नोंदवावी, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीचा उमेदवार निवडावा असे आवाहन करण्यात आले.
सदर अभियानात नागरिकांनी व विशेष म्हणजे तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अभियानात “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशा प्रकारची नागरिकांनी शपथ घेतली.

सदर कार्यक्रम कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त माननीय सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, प्रमोद चव्हाण, रूपाली शेडगे मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे यांनी परिश्रम घेतले..



कसा सुरू झाला मतदान दिन..
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजी सत्तेच्या पारतंत्र्याच्या साखळदंडातुन सुटका मिळाली म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी एक स्वतंत्र राजकीय प्रणाली असण्याची नितांत गरज आहे असे तत्कालीन सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी व क्रांतिकारकांनी एकत्र बसून विचार विनिमय केला. त्या अनुषंगाने भारताचा राज्यकारभार करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एक मतावर येऊन संसदीय लोकशाही प्रणालीचा स्वीकार केला.
तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये राज्यकारभार कसा करायचा याविषयी संभ्रमावस्था होती. भारत देशामध्ये अनेक भाषा बोलणारे विविध जात, धर्म, पंथाचे लोक नांदत होते. अनेक राज्याची भाषावार प्रांत रचना अस्तित्वात आली. अशाप्रकारे विविधतेत एकतेने नटलेला भारत देश एकसंध राहावा या उद्देशाने तत्कालीन नेत्यांनी “लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही” या शासन प्रणालीचा स्वीकार करून देशावर राज्यकारभार करण्यास सुरुवात केली.
राज्यकारभार करण्यासाठी एक स्वतंत्र राज्यघटना आवश्यक आहे आणि ती अस्तित्वात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी विचारविनिमय करून एक “घटना समिती” निर्माण करण्यात आली. घटना समितीचे अध्यक्ष तत्कालीन पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. तद्नंतर त्या सर्व नेत्यांनी कायदेशीर मसुदा समिती तयार करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली. घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील २२६ देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून दोन वर्ष ११ महिने १७ दिवस या कालखंडात भारताची राज्यघटना लिहून तयार केली.
सदर लिखित राज्यघटनेमध्ये जनतेला सर्वोच्च स्थान देऊन २५ जानेवारी १९५१ साली सर्व जाती-धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार सुपूर्द केला. तो दिवस म्हणजे १९५१ पासून ते आजतागायत “मतदान दिन” म्हणून दरवर्षी साजरा करतो. या मतदान दिन म्हणून साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे भारताची संसदीय लोकशाही प्रगल्भ व्हावी जनतेला आपला प्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणारा, जनतेला राजा मानणारा, जनतेच्या हितासाठी राज्य चालवणारा, निष्काम सेवा करणारा,जनतेच्या हिताचे व हक्काचे रक्षण करणारा एक सुशिक्षित, कर्तव्यदक्ष, सुसंस्कृत असा उमेदवार लोक प्रतिनिधी नेता म्हणून निवडण्याचा अधिकार मतदान दिन या दिवशी मतदान करण्याचा हक्क दिला.



